जळगाव, प्रतिनिधी । ऑगस्टच्या तिसर्या सप्ताहात शनिवारी २१ रोजी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणात सर्वात जास्त ४९ हजाराहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. तर गुरूवारी जिल्हा प्रशासनास ५०हजार ३० कोविशिल्ड तर २८४० कोव्हॅक्सिन अशा प्रमाणात लसीची मात्रा उपलब्ध झाली. त्यानुसार शुक्रवारी दिवसभरात शहरी व ग्रामीण भागातील विविध केंद्रांवर ५३ हजार ८९ नागरिकांना पहिल्या व दुसर्या टप्प्याचे लसीकरण करण्यात आले.
गत सप्ताहापेक्षा शुकवारी ४हजाराहून जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. सद्यस्थितीत शहरी भागातील नागरिकांपेक्षा ६४ हजार २४७ नागरिकांचे लसीकरण ग्रामीण भागात झाले असून लसीकरणात ग्रामीण भाग आघाडीवर असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.टी.जमादार यांनी म्हटले आहे.
जिल्हयात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाला दिवसेंदिवस वेग येत असून ऑगस्टच्या तिसर्या सप्ताहात ४३५३० कोविशिल्ड तर ५१८० कोव्हॅक्सीन अशी मात्रा प्राप्त झाली होती. जिल्ह्यात लसीकरण मोहिमेच्या प्रारंभी नागरिकांचा प्रतिसाद कमी असल्याने दिवसाला किमान एक ते दोन हजार अशा प्रमाणात लसीकरण केले जात होते. परंतु दुसर्या लाटेदरम्यान जिल्हा प्रशासनासह अन्य समाजमाध्यमे प्रसार माध्यमांव्दारे वेळेावेळी करण्यात आलेल्या जनजागृतीमुळे जिल्ह्यात लसीकरणाला वेग आला असून ऑगस्ट महिन्यात प्राप्त लसीची मात्रेच्या माध्यमातून दिवसांला प्रत्येक केंद्रनिहाय तीन ते पाच हजार असे लक्षांकानुसार लसीकरण केले जात आहे. त्यानुसार आतापर्यत ५३ हजार ८९ नागरिकांना पहिल्या व दुसर्या टप्प्याचे लसीकरण करण्यात आले आहे.
लसीकरणाचा वेग शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात जास्तच असून शहरी भागात ४लाख १०हजार ८६३ नागरिकांना पहिला डोस तर १लाख ९०हजार ४३ जणांना दुसरा डोस असे एकूण ६लाख ९०६ नागरिकांचे लसीकरण झाले तर ग्रामीण भागात ५लाख १७हजार ५५७ नागरिकांना पहिला डोस तर १लाख ४७हजार ५९६ जणांना दुसरा डोस असे एकूण ६लाख ६५हजार १५३ लसीकरण करण्यात आले असल्याचे जिल्हा आरोग्य प्रशासनाने म्हटले आहे.
अधिक प्रमाणात लसीची मात्रांचा पुरवठ्यासाठी आग्रही
जिल्ह्यात संसर्ग प्रादूर्भावामुळे पहिल्या व दुसर्या लाटेच्या संकटाचा सामना करावा लागला. नैसर्गिक आपत्तीत जिल्हा प्रशासनाने अतिशय संयम राखत नियोजन करीत प्रसंगी कठोर निर्णयांची अंमलबजावणी केल्यामुळे संसर्ग साखळी खंडीत होत असून सद्यस्थितीत २४ ऍक्टीव्ह रूग्णांवर उपचार केले जात आहेत. रूग्ण पॉझिटिव्हीटी दरासह मृत्यूदराचे देखिल प्रमाण कमी झाले आहे. आगामी काळात तिसर्या लाटेची शक्यता लक्षात घेता प्रशासन सर्वतोपरी सज्ज असून जिल्ह्यात अधिक प्रमाणात लसीची मात्रांचा पुरवठा व्हावा यासाठी विभागस्तरावर प्रयत्न केले जात आहे. व प्राप्त संसर्ग प्रतिबंधात्मक लसीच्या मात्रेच्या प्रमाणानुसार नागरिकांच्या लसीकरणाला प्राधान्य दिले आहे.
अभिजीत राऊत,
आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी, जळगाव.