जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा नियेाजन समितीची बैठक राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार, 30 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 1.00 वाजता जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
या बैठकीत समितीच्या 29 जानेवारी 2021 रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त मान्य करणे, जिल्हा वार्षिक योजना 2020-21 मध्ये माहे मार्च-21 अखेर झालेल्या खर्चास मंजुरी देणे (सर्वसाधारण, अनुसुचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना, आदिवासी उपयोजना बाह्य क्षेत्र), जिल्हा वार्षिक योजना 2021-22 मध्ये माहे जुलै-21 अखेर खर्चाचा आढावा घेणे, (सर्वसाधारण, अनुसुचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना, आदिवासी उपयोजना बाहय क्षेत्र), नियोजन विभाग, शासन निर्णय दि. 28 एप्रिल, 2020 नुसार सन 2020-21 मध्ये मंजुर नियतव्यय रु. 375 कोटीच्या 25 टक्केच्या मर्यादेत कोविड-19 उपाययोजनांसाठी खर्च करण्यात आलेल्या 44 कोटी 9 लाख 16 हजार रुपयांच्या निधीस कार्योत्तर मंजुरी देणे, नियोजन विभाग, शासन निर्णय, दिनांक 19 एप्रिल 2021 नुसार सन 2021-22 साठी एकूण मंजुर नियतव्यय रुपये 400 कोटीच्या 30 टक्के रक्कम रुपये 120 कोटी निधी कोविड-19 उपययोजनांसाठी खर्च करण्याच्या पुनर्विनियोजन प्रस्तावास मान्यता देणे तसेच अध्यक्षांच्या परवानगीने येणारे आयत्या वेळेच्या विषयांवर चर्चा करण्यात येणार असल्याचेही जिल्हा नियोजन अधिकारी श्री. पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.