नवी दिल्ली : अगदी काही दिवसांवर आलेल्या दिवाळीसाठी सर्व देशभरात तयारी सुरु झाल्याचे चित्र दिसत आहे. परंतु यंदा देशभरात दिवाळी साजरी होत असताना राजस्थानमध्ये राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. यंदा राजस्थानमध्ये फटाक्यांवर निर्बंध – मुख्यमंत्री अशोक गेहलोत.
राजस्थानमध्ये फटक्यांची विक्री व फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर व करोनाबाधितांच्या आरोग्यासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.
यंदा फटाक्यांचा वापर न करता दिवाळी साजरी करण्याचे मुख्यमंत्री गेहलोत यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. ‘फटाक्यांमधून निघणाऱ्या विषारी वायूपासून करोनाबाधित रुग्ण आणि सर्वसामान्यांच्या आरोग्याच्या रक्षणासाठी, राज्यात फटक्यांची विक्री आणि आतिषबाजीवर बंदी घालण्याचे, तसेच फिटनेस प्रमाणपत्र नसलेली व धूर सोडणाऱ्या वाहनांवर कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. असे ट्विट मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केले आहे.’
जर्मनी, यूके, फ्रांस, इटली, स्पेन सारख्या देशांमध्ये करोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. काही देशांना तर पुन्हा लॉकडाउन सुरू करावा लागला आहे. आपल्याकडे देखील अशीच परिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून काळजी घ्यावी लागणार आहे. असेही गेहलोत यांनी सांगितले आहे.
जगभरासह देशभरात थैमान घालणाऱ्या करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही सुरूच आहे. देशात मागील २४ तासांमध्ये ४५ हजार २३० नवे करोनाबाधित आढळले असून, ४९६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता ८२ लाख २९ हजार ३१३ वर पोहचली आहे. करोना संसर्गाचा वेग जरी काहीसा मंदावला असला तरी देखील कराना रुग्ण संख्येत व मृतांच्या संख्येत भर पडतच आहे.
अजून वाचा
गिलगिट-बाल्टिस्तानवरून भारताने पाकला पुन्हा एकदा खडसावले