जळगाव प्रतिनिधी – तीन वर्षांपूर्वी रेल्वेस्थानकाची भिंत पाडून खान्देश सेंट्रलच्या परिसरातून मार्ग करण्यात आला हाेता; परंतु गेल्या काही महिन्यांपासून जागा मालकांनी या मार्गाने हाेणारी वाहतूक थांबवली आहे. वास्तविक महापालिकेने मंजुरी देताना सार्वजनिक वापरासाठी रस्ता खुला केलेला असतानाही रहदारीला मनाई करण्यात आल्याने राष्ट्रवादी अर्बन सेलच्या वतीने जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त अभिजित राऊत यांच्याकडे तक्रार केली आहे.
डाॅ. बाबासाहेब आबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरात हाेणारी वाहतूक काेंडी टाळण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी किशाेर राजेनिंबाळकर त्यांच्या कार्यकाळात रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून रेल्वेची भिंत पाडून त्या ठिकाणी येण्या-जाण्यासाठी मार्ग करण्यात आला आहे. गेली दाेन ते अडीच वर्षे खान्देश सेंट्रलच्या परिसरातून वाहतूक सुरू हाेती. यामुळे एकाच बाजूने हाेणारी वाहतूक काेंडीदेखील टळत हाेती. तसेच पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था असल्याने समस्या सुटली हाेती; परंतु गेल्या काही महिन्यांत हा मार्ग रहदारीसाठी बंद करण्यात आल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. गेट बंद करून ठेवल्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांची अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान गुरुवारी सायंकाळी पाहणी केली असता गाेविंदा रिक्षा स्टाॅपकडून खान्देश सेंट्रलच्या परिसरातून रेल्वेस्थानकाकडे जाण्याचा एक मार्ग बंद केला आहे. तर नेहरू चाैकातून खान्देश मिल परिसराकडे जाणारा मार्ग बंद हाेता.
रस्ता खुला करण्याची केली प्रशासनाकडे मागणी
राष्ट्रवादी अर्बन सेलच्या जिल्हाध्यक्षा तथा माजी नगरसेविका अश्विनी देशमुख यांनी जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त अभिजित राऊत यांना निवेदन दिले आहे. गाेविंदा रिक्षा स्टाॅप व नेहरू चाैकाकडून रेल्वेस्थानकाकडे जाणारा मार्ग राजमुद्रा कंपनीच्या मालकाने बंद केला आहे. ताे पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली आहे. मालकाने महापालिकेकडून एनए व बांधकाम परवानगी गेल्या ४ वर्षांपासून मिळवली आहे. त्यामुळे ताे रस्ता महापालिकेच्या मालकीचा असून, वाहतुकीसाठी खुला हाेणे गरजेचे आहे; परंतु रहदारीत मनाई करण्यात येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनावर अॅड. विजय भास्कर पाटील, महिला अध्यक्षा मंगला पाटील, माजी नगरसेवक अशाेक लाडवंजारी, दिलीप शेवाळे, सुनील माळी, सुहास चाैधरी, मनाेज पाटील, प्रतिभा शिरसाठ, युगल जैन आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.