जळगाव, प्रतिनिधी । शोषितांचे आक्रोश कादंबरी, पोवाड्यातून मांडणारे लोकशाहीर, साहित्यसम्राट व लोककलेचे उपासक अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्यातर्फे रविवार, 1 ऑगस्ट रोजी महापौर जयश्री महाजन व जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी नेरी नाका परिसरातील अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन केले.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, रमाबाई ढिवरे, मिलिंद सोनवणे, सागर सपकाळे, प्रतिभा भालेराव, किरण अडकमोल, प्रताप बनसोडे, प्रवीण परदेशी, मोहन चव्हाण, बापू थोरात, ओम थोरात, नरेंद्र मोरे, दादा राठोड, नारायण अटकोरे, मनोज अडकमोल, किरण कोळी आदी उपस्थित होते.
दरम्यान, अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचे जळगावातील पाईक सागर आंबोरे यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर 26 जुलै 2021 रोजी ‘महापौर सेवा कक्षा’कडे नेरी नाका परिसरातील अण्णा भाऊ साठे चौक परिसरात कमालीची अस्वच्छता निर्माण झालेली असल्याने हा परिसर संपूर्णपणे स्वच्छ करण्यात येऊन या भागाचे सुशोभीकरण करण्यात यावे, अशी तक्रार नोंदविली होती. त्यानंतर यासंदर्भात महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील व महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांनीही तत्काळ पुढाकार घेतला व ही तक्रार जळगाव शहर महानगरपालिकेतील आरोग्य विभागाचे अधिकारी काशिनाथ बडगुजर यांच्याकडे पाठविली असता 27 जुलै 2021 रोजी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांनी तत्काळ या परिसराला भेट देऊन तेथील संपूर्णपणे स्वच्छता केली. त्यानंतर पुतळा परिसरातील भिंतीची डागडुजी व दुरुस्ती करून रंग देण्यासह सुशोभीकरण करून तक्रारीचे निवारण करण्यात आले. याबद्दल आंबोरे व कार्यकर्त्यांनी महापौरांसह महापालिका कर्मचार्यांप्रती समाधान व्यक्त केले.