जळगाव, प्रतिनिधी । शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सोमवारी २६ जुलै रोजी हात व पाय फॅक्चर झालेल्या व्यक्तीचे ऑपरेशन करण्यात आले. रुग्णालय कोरोनाविरहित झाल्यानंतर रुग्णालयात दोन शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. यामुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनामुळे सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया बंद होत्या.
गेली चार महिन्यांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी उपचार होत होते. मात्र कोरोना महामारीची दुसरी लाट ओसरली तसे जिल्हाधिकारी यांनी २२ जुलै रोजी रुग्णालय पुन्हा सामान्यांसाठी कोरोनाविरहित सर्व आजाराच्या उपचारासाठी खुले केले. त्यात पहिले शस्त्रक्रिया अट्रावल ता. यावल येथील २७ वर्षीय सविता कोळी यांचे झाले. त्यांना पोट दुखत असल्यामुळे दाखल करण्यात आले होते. निदान केल्यावर अपेंडिक्स दिसून आला. तत्काळ रविवारी सकाळी महिलेवर शस्त्रक्रिया करून दिलासा देण्यात आला. शल्यचिकित्सा शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मारोती पोटे, डॉ. संगीता गावित, डॉ. प्रशांत देवरे, डॉ. मिलिंद चौधरी यांनी हि शस्त्रक्रिया केली.
महादेव सपकाळे (वय ३२) रा. मुक्ताईंनगर यांचा उजवा हात व पाय फॅक्चर झाल्याने रुग्णालयात दाखल आहे. त्यांच्यावर सोमवारी सकाळी अस्थिव्यंगोपचार विभागाचे प्रमुख डॉ. योगेश गांगुर्डे, डॉ. राजेंद्र अग्रवाल, डॉ. गोपाळ ढवळे यांनी हात व गुडघ्यावर शस्त्रक्रिया करून त्याला दिलासा दिला. शस्त्रक्रियांसाठी बधिरीकरण शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संदीप पटेल, डॉ. अनिल पाटील, डॉ. किरण सोनवणे आदींनी सहकार्य केले.
दरम्यान , रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल होण्याकरिता रुग्णांच्या नातेवाईकांनी आधारकार्ड, रेशनकार्ड घेऊन यावे जेणेकरून त्याला महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी सहकार्य करता येईल, असे आवाहन रुग्णालयाने केले आहे.