जळगाव – चोपडा तालुक्यातील सातपुड्याच्या जंगलात शिरपूर येथील संस्थेचे विमान कोसळून एक जण ठार तर शिकावू मुलगी जखमी झाल्याची घटना १६ जुलै रोजी घडली होती. जखमी शिकाऊ वैमानिक मुलीला जंगलातून मुख्य रस्त्यावर उभ्या रुग्णवाहिकेपर्यंत पोहचविण्यासाठी आवश्यक झोळीसाठी विमलाबाई हिरामण भिल वय ६१ रा. वर्डी ता. चोपडा या वृध्देने अंगावरची साडी काढून देत मदत केली होती. प्रसंगावधान राखून केलेल्या मदतीबद्दल विमलाबाई भिल यांचा गुरुवार, २२ जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेतर्फे पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांच्याहस्ते साळीचोळी तसेच पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
पोलीस अधीक्षक कार्यालयात स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांच्या कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बोलतांना किरणकुमार बकाले म्हणाले की, वैमानिकला वाचविण्यासाठी अंगावरची साडी काढून देत विमलाबाई भिल यांनी जे प्रसंगावधान राखून मदत केली. या मदतीबद्दल त्यांचे कौतुक त्यांचा हा सत्कार करण्यात आल्याचे सांगितले. तर सत्काराला उत्तर देतांना विमलाबाई भिल यांनी त्यांच्या बोलीभाषेत मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, सून, मुलगा यांच्यासोबत शेतात काम करत होते, यावेळी घटना घडली. घटनास्थळी पोहचले, त्यावेळी शिकाऊ वैमानिक अंशिका लखन गुजर ही विमानात अडकलेली होेती, जंगल परिसर असल्याने त्याठिकाणाहून तिला बाहेर काढून रुग्णवाहिकेपर्यंत हलविण्यासाठी कुठलीही व्यवस्था नव्हती. त्यामुळे झोळी करुन तिला हलविण्याचे ठरल्यावर मी अंगावरची साडी काढून झोळी बनविण्यासाठी दिली. त्या झोळीतून तिला रुग्णवाहिकेपर्यंत पोहचविण्यात आले. मी खूप काही मोठे काम केले नाही, मला काहीही नको, जखमी अंशिका लवकर बरी व्हावी, बरी झाल्यावर तीने मला भेटायला यावे, आणि माझ्या मुलांना आशिर्वाद द्यावा द्यावा असेही यावेळी विमलाबाई यांनी बोलतांना सांगितले.