जळगाव – जळगाव शहर महानगरपालिकेसह जिल्ह्यातील नगरपालिका/ नगरपरिषदांचे प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावून जिल्ह्याच्या विकासाचा अनुशेष भरुन काढणार असल्याचे आश्वासन नगरविकास मंत्री ना. एकनाथराव शिंदे यांनी आज दिले. दरम्यान, जळगाव शहरातील रस्त्यांसाठी ४२ कोटींचा निधी तात्काळ मंजूर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे जळगाव जिल्हा दौर्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी सायंकाळी मनपा सभागृहात जिल्ह्यातील नगरपालिकांची आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, संपर्क प्रमुख संजय सावंत, विलास पारकर, मनपा आयुक्त सतीष कुलकर्णी आदि उपस्थित होते.
आढावा बैठकीत बोलातांना ना. शिंदे यांनी नगरविकास विभागाची मुंबईत स्वतंत्र बैठक घेवून चर्चा करण्याचे आश्वासीत केले आहे.
रस्त्यांसाठी तात्काळ ४२ कोटी मंजूर करणार
शहरातील रस्ते सुस्थितीत रहावे यासाठी ४२ कोटी रूपयांच्या निधीला तात्काळ मंजुरी देण्यात येणार असल्याचे ना. शिंदे यांनी यावेळी सांगितले.
गाळ्यांबाबत धोरणात्मक निर्णय घेणार
जळगाव मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या व्यापारी संकुलातील गाळ्यांचा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहे. सर्वसामान्य गाळेधारकांना न्याय मिळेल. आणि महानगरपालिकेला उत्पन्न मिळेल. यासाठी गाळ्यांबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल. असे अश्वासन ना. शिंदे यांनी यावेळी दिले.
मेहरुण तलावाच्या सुशोभिकरणासाठी पर्यावरण मंत्र्यांशी चर्चा करणार
मेहरुण तलावाच्या सुशोभिकरणासाठी ५१ लाखांचा प्रस्ताव मंजुर करावा. अशी अपेक्षा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली. यावर बोलतांना ना. शिंदे यांनी पर्यावरण मंत्र्यांशी चर्चा करुन निधी देण्यात येणार असल्याचे नगरविकास मंत्री श्री. शिंदे यांनी यावेळेस सांगितले.
प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार
विकासाच्या अनुषंगाने जळगाव महानगरपालिका आणि जिल्ह्यातील नगरपालिकांनी प्रलंबित प्रश्नांची सुची तयार करावी. हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव आणि अधिकारी यांची मुंबईत बैठक घेवून जे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याजोगे असतील, ते तातडीने मार्गी लावणार असल्याचे ना. शिंदे यांनी सांगितले.
आढावा बैठकीत मनपासह जिल्ह्यातील न.पा. शहराच्या विकासासाठी उत्पन्नाचे स्त्रोत वाढवा, लोकसभागातून कामे करा, आस्थापना खर्चावर नियंत्रण आणा, विकास कामे दर्जेदार करा, ती वेळेत पुर्ण करा. अशा सूचना ना. शिंदे यांनी आढावा दिल्यात.
विकासाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी २५१ कोटींची अपेक्षा-पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील
जळगाव जिल्ह्याच्या विकासाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी २५१ कोटी निधीची अपेक्षा असल्याचे मत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली. जळगाव शहराच्या विकासासाठी डिपीडीसीतून ६१ कोटींचा निधी दिला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सुवर्ण जयंती योजनेअंतर्गत ४२ कोटींचा निधी मंजुर करण्यात आल्याचेही पालकमंत्र्याकडुन सांगण्यात आले.
नगरविकास विभागाकडून विकासासाठी १५१ कोटी निधी मंजुर करावे. मेहरुण तलावाच्या सुशोभिकरणासाठी ५१ लाखांचा प्रस्ताव मंजुर करावा. हुडकोच्या कर्जाबाबत दिलासा द्यावा, गाळ्यांचा प्रलंबित प्रश्न सोडवावा, नगरपालिकांमधील रिक्त पदे भरावीत, चाळीसगाव- जामनेरसाठी मुख्याधिकार्यांची नियुक्ती करावी. नशिराबाद ग्रा.पं.चे नगरपरिषदेत रुपांतर झाले असून त्यासाठी निधी मिळावा, पारोळा-वरणगावमध्ये न.पा.च्या स्वतंत्र इमारतीसाठी निधी द्यावा. अशी अपेक्षा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.