जळगाव – राष्ट्रवादीचे दिवंगत नेते स्व. डॉ.हाजी गफ्फार मलीक यांच्या स्मरणार्थ रविवार दि.११ रोजी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असून शिबिरात हजारापेक्षा अधिक बाटल्या रक्त संकलित केले जाईल असा विश्वास आयोजक एजाज मलीक व नदीम मलीक यांनी व्यक्त केला आहे.
स्व. डॉ.अब्दुल हाजी गफ्फार मलीक यांचे नुकतेच निधन झाले असून त्यांच्या स्मरणार्थ आणि सध्या असलेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेता दि.११ जुलै रविवार रोजी सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत मलीक हाऊस, शनीपेठ येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. रेडक्रॉस रक्तपेढी, डॉ. माधवराव गोळवलकर आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या माध्यमातून शिबिराचे आयोजन केले जात असून डॉ. अब्दुल गफ्फार मलीक फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिबिरासाठी परिश्रम घेणार आहेत.
स्व.सईद मलीक उर्फ बावा यांच्या स्मरणार्थ काही वर्षापूर्वी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात १२०० बाटल्या रक्त संकलीत करण्यात आले होते. सध्या कोरोना काळ असून गर्दी होऊ नये म्हणून व्यवस्था करण्यात आली आहे तरीही सोशल डिस्टनसिंगचे पालन करीत गेल्या वेळीचा आकडा मोडीत काढण्याचा आमचा मानस असल्याचे एजाज मलीक यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क बंधनकारक केले असून हात सॅनिटाईझ करण्याची व्यवस्था देखील करण्यात आली असल्याचे आयोजकांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पत्रकार परिषदेला वाहाब मलीक, एजाज मलिक, नदीम मलिक, फैसल मलीक उपस्थित होते.