मुंबई प्रतिनिधी – भोसरी येथील वादग्रस्त भूखंडाच्या खरेदी प्रकरणी सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीतर्फे चौकशी सुरू करण्यात आली आहे. या अनुषंगाने मंगळवारी खडसे यांचे मोठे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली. ही जमीन गिरीश चौधरी आणि मंदाकिनी खडसे यांनी संयुक्तरित्या खरेदी केली असून एकनाथराव खडसे यांनी मंत्रीपदाचा गैरवापर केल्याचा चौकशीत ठपक ठेवण्यात आला आहे. यामुळे या प्रकरणी खडसे दाम्पत्याला अटक होऊ शकते अशी चर्चा होती. यातच काल सायंकाळी खडसे यांना ईडीने समन्स बजावून आज ११ वाजता चौकशीसाठी बोलावले होते. त्यानंतर रात्री सव्वाआठच्या सुमारास म्हणजेच नऊ तासांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर एकनाथराव खडसे हे ईडीच्या मुंबई येथील कार्यालयातून बाहेर पडले. त्यांनी ईडीला चौकशीत पूर्ण सहकार्य केले असून ईडीला आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे ही दहा दिवसांच्या आत देण्याचेही त्यांनी सांगितले. यानंतर ईडीच्या कार्यालयातून सरळ ते आपल्या निवासस्थानी गेले होते.