जळगाव – भारतीय जनता पक्षाच्या गटनेत्यास बदलण्यात यावे या मागणीसाठी आज महापौर जयश्री सुनील महाजन यांना पत्र देण्यात आले असून या माध्यमातून ऍड. दिलीप पोकळे हे गटनेते तर चेतन संकत हे उपगटनेते असतील अशी माहिती मिळाली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय जनता पक्षाचे गटनेते बदलण्याची चर्चा सुरू आहे. यावर भाजपच्या नगरसेवकांनी जिल्हाध्यक्षांच्या परवानगी शिवाय गटनेते बदलता येणार नसल्याचा दावा केला होता. या पार्श्वभूमिवर, आज सायंकाळी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यासह त्यांच्या सहकार्यांनी महापौर सौ. जयश्री सुनील महाजन यांना पत्र दिले. यात पक्षाच्या गटनेतेपदी ऍड. दिलीप पोकळे तर उपगटनेतेपदी चेतन संकत यांची नियुक्ती करण्यात यावी असे सुचविण्यात आले आहे. याप्रसंगी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यासह नगरसेवक नवनाथ दारकुंडे, ऍड. दिलीप पोकळे, चेतन संकत, कुंदन काळे, गोकुळ पाटील, किशोर बाविस्कर, उमेश सोनवणे आदींची उपस्थिती होती.