जळगाव – लक्ष्मी नगर येथील एका सलून व्यावसायिक तरुणाने कर्जबाजारीपणाला कंटाळून आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. गजानन कडू वाघ रा. लक्ष्मी नगर असे मयत तरुणाचे नाव आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .
जामनेर तालुक्यातील माळपिंप्री येथे राहणारे गजानन वाघ काही वर्षांपासून जळगाव शहरात स्थायिक झाले होते. लक्ष्मीनगरात भाड्याच्या खोलीत ते पत्नी व दोन मुलांसह राहत होते. सलुन दुकानावर कारागिर म्हणून ते काम करीत होते. अशात गतवर्षी लागलेल्या लॉकडाऊनमुळे दुकाने बंद पडली. त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न त्यांच्या समोर होता. गजानन वाघ यांनी शनिवारी मध्यरात्री राहत्या घरात पंख्याला दोरी बांधुन गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी ८.३० वाजता त्यांच्या पत्नी सरला यांच्या लक्षात हा प्रकार आला. यानंतर लहान भाऊ ईश्वर वाघ याच्यासह परिसरातील नागरीकांनी वाघ यांना खाली उतरवुन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदन करुन मृतदेह कुटंुबीयांच्या ताब्यात देण्यात आला. दुपारी माळपिंप्री येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत वाघ यांच्या पश्चात पत्नी सरला, आई लताबाई, मुलगा ऋषीकेश (वय ५) व मुलगी वैष्णवी (वय ३) असा परिवार आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.