मुंबई वृत्तसंस्था – हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे अभिवादन केले. स्व.नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या करण्यात येणाऱ्या कृषी दिनाच्याही मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी उपस्थित कृषी मंत्री दादाजी भुसे, रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांनीही स्व.नाईक यांना अभिवादन केले.
अभिवादन संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, महाराष्ट्राला अन्न-धान्याच्या उत्पादनात स्वयंपूर्ण करण्याचा निर्धार स्व.वसंतराव नाईक यांनी तडीस नेला. हाडाचे शेतकरी आणि कृषीतज्ज्ञ असलेल्या नाईक यांनी आपल्या अनुभवाचा शेती आणि सिंचन क्षेत्राच्या विकासासाठी उपयोग केला. शेतकरी स्वावलंबी व्हावा असा त्यांचा ध्यास होता. शेतीतील आव्हानांवर मात करण्याची, आधुनिकीकरण स्वीकारण्याची प्रेरणा स्व. नाईक यांनी दिली. यातूनच आपला शेतकरी आज कोरोनाच्या संकटकाळातही न डगमगता धीराने उभा आहे. स्व. नाईक यांच्या प्रेरणेतून शासन कृषी क्षेत्राच्या विकासाचे धोरण राबवित आहे. सुजलाम्-सुफलाम् महाराष्ट्र हे त्यांचे स्वप्न साकारण्यासाठी आपण सर्व कटीबद्ध राहूया. स्वर्गीय वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. राज्यातील शेतकरी माता-भगिनी आणि बांधवांना कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.