जळगाव – पावसाळा सुरु झाल्याबरोबर घरोघरी आजार देखील डोकावू लागतात. घरातील प्रत्येक वयोगटाच्या व्यक्तीने आजारापासून बचाव करण्यासाठी घरगुती उपाय देखील केले पाहिजे. त्यामुळे आजार दूर राहतात, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता गावीत यांनी दिली आहे.
कोरोना महामारीची दुसरी लाट आटोक्यात आली आहे. उन्हाळा संपून पावसाळा सुरु झाला असून वातावरणात बदल झाले आहेत. त्यामुळे या बदलत्या वातावरणात आपले आरोग्य सांभाळणे महत्वाचे झाले आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. संगीता गावीत यांनी जनतेला माहिती उपलब्ध करून दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, बाहेरून आल्यावर हात पाय स्वच्छ धुवावे. कोमट पाण्याने अंघोळ करावी. रोज स्वच्छ व कोरडे कपडे घालावे. पायाची विशेष काळजी घ्यावी.
शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी गरम सूप पिणे, पाणी उकळून पिणे, ताजे अन्न खाणे, तळलेले पदार्थ कमी खावे यासह दिवसभरात मध्यवेळेत भूक लागली तर गरम पेय, ग्रीन टी आदी पौष्टीक पेय घ्यावे. बाहेरील उघड्यावरील अन्न पदार्थ खाऊ नये. शरीरात मिठाचे प्रमाण समतोल ठेवावे. घराच्या परिसरात स्वच्छता ठेवावी . घरातील कचरा घंटागाडीतच टाकावा, झाडांच्या पालापाचोळाची योग्य विल्हेवाट लावावी, आजूबाजूच्या सांडपाण्याचा निचरा होत असल्याबाबत खात्री करावी, शक्यतो गर्दी टाळावी अशा सूचना डॉ. संगीता गावित यांनी प्रसारमाध्यमांद्वारे दिल्या आहेत. यामुळे शरीर निरोगी बनण्यामध्ये व भावी पिढी निरोगी व सुदृढ बनेल.