चाळीसगाव प्रतिनिधी । कोणाला आत घ्यायचे, बाजूला करायचे, बाहेर काढायचे हे चांगलेच माहीत. मी राजकारणातील कुस्तीपटू असून धोबीपछाडसह सर्व डावपेच आपल्याला माहित असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी येथील कार्यक्रमात केले. सध्याच्या राजकीय पार्श्वभूमिवर महाजन यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
आण्णासाहेब कोळी पैलवान व्यायाम शाळेचे भूमिपूजन माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, आमदार रमेश पाटील, माजी आमदार साहेबराव घोडे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख उमेश गुंजाळ, नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांच्यासह पालिकेतील नगरसेवक व अन्य पदाधिकारी यांच्यासह कुस्ती पटू उपस्थित होते.
याप्रसंगी आ. गिरीश महाजन यांनी जोरदार फटकेबाजी केली. ते म्हणाले की, राजकीय जीवनात वावरतांना कबड्डीसह सहा खेळ खेळलो आहे. त्यामुळे कुस्ती खेळात मी चांगलाच पारंगत आहे.
राजकारणही कुस्ती सारखाच खेळ असून धोबीपछाडसह सर्व डावपेच आपल्याला माहिती आहे. कोणाला आत घ्यायचे, कोणाला बाजूला करायचे व कोणाला बाहेर काढायचे हे आपणास चांगलेच माहीत आहे. मी ही राजकारणातील कुस्तीपटू आहे.
जगातील युवा देश म्हणून भारताची ओळख आहे. परंतु देशातील युवा पिढी व्यसनांकडे वळत आहे. निरोगी शरीर हे निरोगी देशाची गरज आहे. तरुणांनी व्यसनांकडे न वळता आपला खरा पुरूषार्थ व्यायाम शाळेत दाखवावा, असे आवाहन या आमदार महाजन यांनी केले.
एकनाथराव खडसे यांनी पक्षत्याग केल्यानंतर नाथाभाऊ व गिरीश महाजन हे एकमेकांना सूचक टोले मारत आहेत. या पार्श्वभूमिवर, गिरीश महाजन यांनी केलेली टोलेबाजी ही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे.
अजून वाचा
हनी ट्रॅपप्रकरणी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकार्यांनी केला खुलासा