जळगाव – राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी मनोज वाणी यांच्या खांद्यावर पक्षातून अलीकडेच निलंबीत करण्यात आलेले विनोद देशमुख यांनी बंदूक धरत निशाणा साधला असल्याचा गंभीर आरोप आज महिला राष्ट्रवादीतर्फे करण्यात आला आहे.
सदर प्रकरणात मनोज वाणी यांच्या पत्रकार परिषदेनंतर आज महिला राष्ट्रवादीनेही पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर पलटवार केला आहे.
त्या म्हणाल्या की, मनोज वाणी यांनी आपल्या कुटुंबावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. यात पाटील कुटुंबाच्या मालकीच्या उमाळे घाटाच्या पायथ्याशी असणार्या टर्निंग पॉइंट या हॉटेलमध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरू होता असा आरोप करण्यात आला आहे. तथापि, आपण २००७ साली ही हॉटेल सुरू केली तेव्हा पेट्रोलियम कंपनीशी करार करून एकाला ही हॉटेल चालवायला दिली होती.
२००९च्या निवडणुकीत आपल्याला जामनेरमधून तिकिट मिळणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर कुणी तरी या हॉटेलबाबत तक्रार केली. या अनुषंगाने पोलीस चौकशी झाली असून यात पाटील कुटुंबातील कुणाच्याही नावाचा उल्लेख नसल्याचे कल्पना पाटील यांनी स्पष्ट केले.
तसेच काही दिवसांपूर्वी पिंप्राळा येथे देहविक्रीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर यातील प्रमुख आरोपी असणारी महिला ही राष्ट्रवादीची सदस्य होती हे खरे असले तरी यानंतर आम्ही स्वत: तक्रार करून याच्या चौकशीची मागणी केली. यामुळे या आरोपातही दम नाही. तर आमच्या कुटुंबाने विनोद देशमुख यांना विनयभंगाच्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप मनोज वाणी यांनी केला होता. मात्र देशमुख यांच्या विरूध्द हरीश आटोळे यांच्या तक्रारीमुळे गुन्हा दाखल करण्यात आला असून याच्याशी देखील आमचा कोणताही प्रकारचा संबंध नाही असे त्या म्हणाल्या.
कल्पना पाटील म्हणाल्या की, विनोद देशमुख यांच्या विरोधात आधीपासूनच खूप तक्रारी होत्या. २००९ सालीच त्यांच्या विरूध्द पक्षातील काही पदाधिकार्यांनी कारवाईची मागणी करण्याचे निवेदन वरिष्ठांकडे पाठविले होते. अलीकडेच त्यांनी आपली व आपल्या कुटुंबाची बदनामी करणारा मजकूर सोशल मीडियात प्रसारीत केला होता. या अनुषंगाने पक्षाने त्यांना निलंबीत केले आहे.
आता त्यांना पक्षातून बडतर्फे करण्याची मागणी आमच्यातर्फे करण्यात येणार आहे. तसेच विनोद देशमुख यांनी या प्रकारचे धंदे बंद करावे अन्यथा त्यांना आम्ही आमच्या स्टाईलने धडा शिकवू असा इशारा देखील कल्पना पाटील यांनी दिला. तर या पत्रकार परिषदेत उपस्थित असणार्या महिलांनी देखील या प्रकरणी पाटील कुटुंबाना अडकवण्याचे हे षडयंत्र असल्याचा आरोप केला.
सदर पत्रकार परिषद सुरू असतांना महिला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी मोबाईलवरून कॉल करून या प्रकरणी आमचा पक्ष हा अभिषेक पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचे सांगितले.