जळगाव प्रतिनिधी । शहरातील एका फायनान्स कंपनीमध्ये काम करणाऱ्या मॅनेजरने कामाच्या ताण – तणावातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
तसेच संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी केला आहे. प्रदीप धनलाल कापूरे (वय-४५) रा. मयूर कॉलनी, जळगाव हे मुथ्थूट होमफिन इंडीया लिमीटेड येथे १ नोव्हेंबर २०१७ पासून क्रेडीट मॅनेजर म्हणून नोकरीला आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून त्यांच्यावर जळगाव जिल्ह्यासह औरंगाबाद जिल्ह्यातील जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे ते गोंधळून गेले. या कामाच्या तणावातून त्यांनी सोमवार २१ जून रोजी पहाटे सहा वाजेच्या पुर्वी घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापुर्वी त्यांनी तीन पानी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे.
सकाळच्या सुमारास सहा वाजेच्या दरम्यान पत्नी सुचिता ह्या मागच्या घरात गेल्या असता त्यांना पतीने आत्महत्या केल्याचे दिसून आले. पतीचा मृतदेह पाहून त्यांनी हंबरडा फोडला. नातेवाईकांनी मृतदेह उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला आहे. दरम्यान, कंपनीच्या तणावातून आत्महत्या केल्याचा आरोपी नातेवाईकांनी केला आहे. पयत प्रदीप कापूरे यांच्या पश्चात पत्नी सुचिता, मुलगा कुणाल, मुलगी यज्ञा, आई सूमनबाई आणि बहिण रेखा शिंपी असा परिवार आहे.