श्रीनगर, वृत्तसंस्था । जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैन्यांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. रविवारी रात्री ही चकमक सुरु झाली. ठार झालेले तिन्ही दहशतवादी लष्कर ए तोयबाचे होते. जम्मू काश्मिर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबारात सुरुवातीला एक दहशतवादी मारला गेला. त्यानंतर एकामागोमाग एक असे दोन दहशतवादी ठार झाले. अद्यापही सर्च ऑपरेशन सुरु आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर काश्मीरच्या सोपोरच्या (Sopore encounter) गुंड ब्रथ भागात रविवारी उशीरा दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. गोळीबारानंतर भारतीय लष्करानं या संपूर्ण परिसराला वेढा घातला. त्यानंतर भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकीस सुरुवात झाली. भारतीय सैन्यांनी केलेल्या गोळीबारात तीन दहशतवादी ठार झाले. दरम्यान अजूनही सर्च ऑपरेशन सुरु आहे.
आयपीजी काश्मीर विजय कुमार यांनी सांगितलं, लष्करचा टॉप दहशतवादी मुदासिर पंडित ही या चकमकीत ठार झाला आहे. पंडित यानं 3 पोलीस, दोन नगरसेवक आणि 2 सामान्य नागरिकांची हत्या केली. एकूण लष्कर ए तोयबाचे तीन दहशतवादी ठार झाले. मुदासिर याच्या नावावर 10 लाख रुपयांचे बक्षिस देखील जाहीर केलं होतं.
यापूर्वी शनिवारी जम्मू-काश्मीर पोलिसांनी बारामुल्ला येथे नार्को टेरर मॉड्यूलचा पदार्फाश केला होता. पोलिसांनी 12 जणांना अटक केली आणि या लोकांकडून 11 पॅकेट हेरॉईन, शस्त्रे आणि काडतुसे तसेच रोकड जप्त केली. आरोपींकडून 10 ग्रेनेड, चार पिस्तूल आणि मोठ्या संख्येने काडतुसे जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. त्याशिवाय 11 पॅकेट हेरॉईनचे, 21.5 लाख रक्कम एक लाख रुपयांचा चेकही जप्त करण्यात आला आहे.