मुंबई, वृत्तसंस्था । शिवसेनेचे राज्यसभेतील माजी खासदार आणि कवी प्रीतीश नंदी यांनी भारतात हवाई प्रवासाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या जेआरडी टाटा यांचे नाव देण्याची मागणी केली आहे.
नवी मुंबईत उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देण्यावरून वाद निर्माण झाला आहे. विमानतळाला माजी खासदार दि.बा. पाटील यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी कृती समितीकडून केली जात आहे. तर शिवसेनेकडून बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची मागणी होत आहे. मागील काही आठवड्यांपासून हा मुद्दा चर्चेत असून, आता शिवसेनेचे राज्यसभेतील माजी खासदार आणि कवी प्रीतीश नंदी यांनी भारतात हवाई प्रवासाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या जेआरडी टाटा यांचं नाव देण्याची मागणी केली आहे.
नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याची मागणी स्थानिक भूमिपूत्रांकडून होत आहे. रायगड, नवी मुंबई, पालघर व ठाणे या चारही जिल्ह्य़ांतून विमानतळाला लोकनेते दि. बा.पाटील यांचे नाव देण्याची मागणी होत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेकडून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची मागणी लावून धरण्यात आली आहे. यावरून कृती समिती आणि शिवसैनिक असा वादही होताना दिसत आहे. विमानतळाला नाव देण्यावरून सुरू असलेल्या वादात माजी खासदार प्रीतीश नंदी यांनी जेआरडी टाटा यांचं नाव देण्याचा सल्ला दिला आहे.
प्रीतीश नंदी यांनी एक ट्विट करून ही मागणी केली आहे. जेआरडी टाटा यांचं नाव देण्यामागील कारणाचाही त्यांनी उहापोह केला आहे. “नवी मुंबई विमानतळाला जेआरडी टाटा यांचं नाव देण्याची कल्पना खूप चांगली आहे. जेआरडी टाटा हे भारतीय हवाई प्रवासी सेवेचे जनक असून, ते या गौरवासाठीही पात्र आहेत. सार्वजनिक ठिकाणांना राजकीय नेत्यांची नाव देण्याचा कंटाळा आलाय,” असं प्रीतीश नंदी यांनी म्हटलं आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी स्थानिक भूमिपुत्रांनी लढा सुरू केला असून २४ जून रोजी दि. बा. पाटील यांच्या स्मृतिदिनी सिडको कार्यालयावर आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या तयारीसाठी उरणमध्ये गाव बैठकांना सुरुवात झाली आहे. या बैठकांच्या माध्यमातून गावा गावातून दि.बां.चे नाव विमानतळाला देण्यात यावे या मागणीसाठी भूमिपुत्रांना एकजूट होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. १० जून रोजी रायगड, नवी मुंबई, पालघर व ठाणे या चारही जिल्ह्य़ांतून विमानतळाला लोकनेते दि. बा.पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी झालेल्या मानवी साखळीत येथील स्थानिक भूमिपुत्रांनी मोठा सहभाग दिला होता. त्याचप्रमाणे पुढील आंदोलन म्हणून २४ जून रोजी सिडकोवर होणाऱ्या आंदोलनातही स्थानिकांनी सहभागी व्हावे यासाठी आंदोलन समितीकडून आवाहन केले जात आहे.