पालघर, वृत्तसंस्था । पालघरच्या डहाणू तालुक्यातील डेहणेपळे येथे एका फटाके बनवणाऱ्या कंपनीत मोठा स्फोट झाला आहे. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. स्फोट इतका भयंकर होता की आजुबाजूची गावेही मोठ्या प्रमाणात हादरली आहे. या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की, सुमारे पाच ते १० किलोमीटर परिसरातील घरांना मोठे धक्के जाणवले.
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीत वेल्डिंगचं काम सुरू होतं, त्याचदरम्यान आग लागल्याने हा स्फोट झाला आहे. कंपनीत मोठ्या प्रमाणात कामगार अडकले असून, त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाना आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नसून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरू झाले आहे.