धुळे – शिरपूर येथील पीडित तरुणीवर जिवंतपणी तर अत्याचार झालेच पण वासनांध झालेल्या दोन विकृतांनी तिला मृत्यूनंतरही सोडले नाही. झाडाला लटकलेला तिचा मृतदेह पाहून त्यांच्या भावना चाळवल्या आणि तो निष्प्राण देह खाली उतरवून त्यांनी त्यावर लैंगिक अत्याचार केल्याची बाब पोलिस तपासात समोर आली आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी पाचव्या संशयित आरोपीलाही अटक केली आहे.
शिरपूर येथून आठ जून रोजी बेपत्ता झालेल्या १८ वर्षीय तरुणीचा मृतदेह शहादारोड परिसरात काटेरी झुडपात आढळला होता. तिच्यावर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला आणि आत्महत्येचा बनाव करत मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत टांगण्यात आला, असे पोलिस तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी रवींद्र उर्फ दादू कोकणी, क्रिष्णा पावरा, सुरेश वेसराम पावरा आणि बाबूलाल पावरा यांना संशयावरून अटक केली आहे. याच गुन्ह्यात सुरेश नरसिंग पावरा नामक आणखी एक नाव समोर आले. मध्यरात्री त्यालाही अटक करण्यात आली आहे.
दोघांनी दिली पाशवी कृत्याची कबुली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेश नरसिंग पावरा याला अटक केल्यानंतर त्याने बाबूलाल पावराच्या साथीने मृतदेहावर केलेले पाशवी कृत्य समोर आले आहे. सुरेश आणि बाबूलाल या दोघांनी तशी कबुली दिली आहे. जिथे पीडित तरुणीचा मृतदेह झाडाला टांगलेला होता तिथून जात असताना या दोघांनी तो पाहिला. तिथे जवळपास कोणीच नाही हे पाहून त्यांनी तो मृतदेह झाडावरून खाली उतरवला आणि त्यावर लैंगिक अत्याचार केले. म्हणजे मृत्यूनंतरही त्या तरुणीच्या मृतदेहाला अवहेलनाच वाट्याला आली आहे. या संतापजनक प्रकाराची कबुली ऐकून पोलिसही अवाक झाले आहेत. दरम्यान, यापूर्वी अटक केलेल्या चौघांच्या पोलिस कोठडीची मुदत बुधवारी संपली. त्यामुळे पाचवा संशयित सुरेश नरसिंग पावरा आणि इतर चौघांना दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. सर्व पाचही संशयितांना १८ तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.