जळगाव – रस्त्याने जाणाऱ्या वाहनधारकांना अडवून त्यांना मारहाण शस्त्रांचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या टोळीचा तालुका पोलिसांनी केला असून तीन जणांच्या टोळीला गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर अवघ्या २४ तासांमध्ये मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून धारदार शस्त्रांसहित गावठी पिस्तुलही हस्तगत करण्यात आले आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, वायरल न्यूज लाईव्हचे पत्रकार आतिक बिलाल खान (वय ४७, रा. मुक्ताईनगर) हे आपल्या मुलाचे इंजेक्शन आणण्यासाठी काल धुळे येथे गेले होते. धुळे येथून परतत असताना गुरूवारी दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास जळगाव विद्यापीठ ते गुजराल पेट्रोल पंपाच्या मध्ये त्यांच्या स्विफ्ट गाडी नंबर एमएच १८डब्ल्यू ६८८५ ला मागून ओव्हरटेक करून प्रत्येकी डबलसीट असणारे दोन मोटर सायकल स्वार यांनी त्यांची कार थांबवली. यांनतर या चार लोकांनी शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी तोंडावर, छातीवर मारा करत त्यांच्या खिशातील ६०० रुपये रोख हिसकावून घेत पळून गेल्याची घटना घडली होती. आतिक बिलाल खान यांनी मुक्ताईनगर येथे गेल्यावर मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला या जबरी चोरीची फिर्याद दाखल केली. सदर गुन्ह्याचे घटनास्थळ जळगाव तालुका पोलिस स्टेशन हद्दीतील होते. त्यामुळे हा गुन्हा जळगाव तालुका पोलिसात वर्ग करण्यात आला. या गुन्ह्यात भा.द.वि. 394, 34 नुसार कलम लावण्यात आले.
यांनी केली कारवाई
पो.नि. रविकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक कल्याण कासार, पो.हे.कॉ. सतिष हाळणोर, पो.हे.कॉ. वासुदेव मराठे, पो.ना. विजय दुसाने, ललित पाटील, प्रविण हिवराळे, सुशिल पाटील, अनिल मोरे, पो.कॉ. दिपक कोळी, दिपक राव यांच्य्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली. पो.नि. रविकांत सोनवणे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार या घटनेतील जबरी लुट करणाऱ्याना ताब्यात घेण्यात यश आले .
या गुन्ह्यातील रोहन उर्फ रॉनी मधुकर सपकाळे (दांडेकर नगर पिंप्राळा जळगाव) हा एका सिल्व्हर रंगाच्या सॅन्ट्रो कार (एमएच 19 क्यु 990) मधून खोटेनगर नजीक महामार्गावर फिरत असल्याचे पो.नि. रविकांत सोनवणे यांना समजले. त्यांनी तात्काळ आपल्या सहका-यांच्या मदतीने त्याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातील कारची तपासणी केली असता त्यात गावठी बनावटीचे पिस्तुल, एक धारदार चॉपर व एक लोखंडी धारदार चाकू तसेच जबरी चोरीतील सहाशे रुपये असा एवज मिळून आला. त्याची सखोल चौकशी केली असता त्याने त्याच्या साथीदारांची नावे कबुल केली. अनिकेत मधुकर सपकाळे (दांडेकर नगर जळगाव) व सतिष रविंद्र चव्हाण (ओमशांती नगर पिप्राळा रोड जळगाव) अशी नावे त्याने उघड केली. उर्वरीत दोघांना देखील ताब्यात घेत अटक करण्यात आली.