जळगाव – राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत जळगांव तालुक्यातील 26 महिलांना प्रत्येकी 20 हजार याप्रमाणे 5 लाख 20 हजार रुपयांच्या मदतीचे धनादेश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात आयोजित कार्यक्रमात वाटप करण्यात आले.
राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेतंर्गत दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील 18 ते 59 वर्षे वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटूंबियांना 20 हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येते. त्यानुसार आज जळगांव शहर व तालुक्यातील 26 महिलांना प्रत्येकी 20 हजार रुपये याप्रमाणे एकूण 5 लाख 20 हजार रुपयांच्या मदतीचे धनादेश पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. या अर्थसहाय्यतून मुलांच्या शैक्षणिक बाबींवर खर्च करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी उपस्थित महिलांना केले.
याप्रसंगी महापौर जयश्रीताई महाजन, तहसीलदार नामदेव पाटील, विष्णुभाऊ भंगाळे, शरद तायडे, रमेशआप्पा पाटील, बाळासाहेब कंखरे, माजी महापौर नितीन लढ्ढा, नगरसेवक नितीन बरडे, जितेंद्र पाटील, सुरेश गोलांडे यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते.
तहसीलदार नामदेव पाटील यांनी प्रास्ताविकात या योजनेसंदर्भात सविस्तर माहिती विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयप्रकाश (बाळा) कंखरे पाटील यांनी केले तर आभार रमेशआप्पा पाटील यांनी मानले.