जळगाव, प्रतिनिधी । शहर महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवे वेतन आयोग लागू केल्याने कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, महापालिका सफाई कामगार युनियनतर्फे आज महापौर जयश्री महाजन यांचे अभिनंदन करण्यात आले.
गेल्या चार वर्षांपासून रखडलेला जळगाव शहर महानगरपालिका कर्मचार्यांचा सातव्या वेतन आयोगाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. राज्य शासनाच्या नगरविकास मंत्रालयाने यासंदर्भात मंगळवारी (8 जून 2021) आदेश जारी केला. गेल्याच आठवड्यात महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन व उपमहापौर श्री.कुलभूषण पाटील यांनी यांनी मुंबईला जाऊन यासंदर्भात नगरविकास व सार्वजनिक बांधकाममंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे यांची भेट घेऊन हा प्रश्न तत्काळ सोडविण्याची मागणी करीत निवेदनही दिले होते. त्यानंतर केवळ आठवडाभरात शासनाने हा निर्णय जाहीर केल्यामुळे महापालिका कर्मचार्यांत आनंदाचे वातावरण असून, त्यांना हा मोठा दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे.
महापालिका कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग शासनाने लागू करावा, ही मागणी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने होत होती. मात्र, महापौर सौ.जयश्री सुनील महाजन यांनी हा प्रश्न मार्गी लावल्याने त्यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचाच भाग म्हणून आज बुधवार, दि. 9 जून 2021 रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास महापालिकेच्या सफाई कामगार युनियनतर्फे अध्यक्ष श्री.अजय घेंगट यांच्या नेतृत्वात महापालिका कर्मचारी अनुक्रमे श्री.अर्जुन पवार, श्री.किरण चव्हाण, श्री.दीपक तांबोळी, श्री.नासीर भिस्ती, श्री.कुंदन तांबोळी, श्री.लखन गोंडाळे, श्री.विकास केदार आदींनी महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन त्यांचे पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले व आभार मानले.