जळगाव, प्रतिनिधी । हवामान आधारित फळपिक विमा योजना (अंबिया बहार) सन २०१९-२० अंतर्गत प्राप्त तक्रारीनुसार जबाबदार विमा कंपनी व बँक शाखांनी ३० जून रोजी सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम त्यांचे बँक खात्यांवर अदा करण्याचे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
हवामान आधारित फळपिक विमा योजना (अंबिया बहार) सन २०१९-२० अंतर्गत प्राप्त तक्रारींबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली (८ जून) पार पडली. यावेळी त्यांनी वरील निर्देश दिलेत. या बैठकीस खासदार रक्षाताई खडसे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, यांच्यासह विविध बँकांचे अधिकारी व विमा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
विमा कंपनीचे प्रतिनिधींनी कृषि विभागांच्या जिल्हा व तालुका कार्यालयात थांबून ३० जून, २०२१ पर्यंत हवामान आधारित फळपिक विमा योजना (अंबिया बहार) सन २०१९-२० अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींचा निपटारा करण्याची सूचना केली.
या बैठकीत हवामान आधारित फळपिक विमा योजना (अंबिया बहार) सन २०१९-२० अंतर्गत आधार नंबर उपलब्ध न होणे/आधार कार्डावरील नाव अर्जावरील नावाशी न जुळणे, सर्व्हे नंबर अवैध असणे इ. कारणासाठी विमा हप्त्याची रक्कम ११२ शेतकऱ्यांना परत करणे. तसेच बॅकेव्दारे महसुल मंडळ/गाव/पिक चुकीचे नमुद केल्यामुळे विमा रक्कम न मिळणे, त्याचबरोबर संबंधित शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर भरली न गेल्याने अथवा चुकीची भरली गेल्याने त्यांना नुकसान भरपाईची रक्कम कमी अथवा मिळाली नाही. अशा तक्रारी शेतकऱ्यांनी कृषि विभागाकडे दाखल केल्या होत्या. या तक्रार अर्जावर बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. ठाकूर यांनी सांगितले.
तसेच हवामान आधारित फळपिक विमा योजना (अंबिया बहार) सन २०२०-२१ अंतर्गत माहे मे, २०२१ मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे प्राप्त सुचना फॉर्मनुसार पंचनामे बजाज अलायन्झ कंपनीचे प्रतिनिधींनी तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी बैठकीत दिल्याचे श्री. ठाकूर यांनी कळविले आहे.