जळगाव – येथील प्रभाग क्र. 19 अंतर्गत समाविष्ट सुप्रिम कॉलनी परिसरातील नागरिकांकडून पाणीप्रश्नी वारंवार केल्या जाणार्या तक्रारींचे गांभीर्य ओळखून आज दुपारी महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन व उपमहापौर श्री.कुलभूषण पाटील यांनी तेथे भेट दिली. तेथील गटारींच्या स्वच्छतेसह घंटागाडी, अमृत योजनेंतर्गत झालेली कामे यांची पाहणी केली. याप्रसंगी नागरिकांनी पाणीप्रश्नासंदर्भात विविध तक्रारी केल्या. त्यावर महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी नागरिकांना आपल्याकडे पाणीपट्टीची थकीत रक्कम असल्यास ती तत्काळ भरा, नवीन कनेक्शन हवे असल्यास आपण त्वरित फॉर्म भरून रक्कम भरणा करा. मी तत्काळ संबंधितांना सूचना करून नळ कनेक्शन देण्याचे आदेश देते, असे सांगत अमृत योजनेच्या अधिकार्यांसह महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांना सूचना करून यासंदर्भात आदेश दिले.
याप्रसंगी प्रभागाच्या नगरसेविका सौ.जिजाबाई भापसे यांचे पुत्र श्री.चंदू भापसे, नगरसेविका सुमित्रा सोनवणे यांचे पुत्र श्री.उमेश सोनवणे, रियाझ बागवान, अमृत योजनेचे अधिकारी श्री.बर्हाटे यांच्यासह महापालिका पाणीपुरवठा, तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी याप्रसंगी या भागातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत आस्थेवाईकपणे चौकशी करीत घंटागाडी दररोज येते का? शौचालयांची स्वच्छता होते का? गटारींमध्ये घाण का टाकली जाते? यासारखे प्रश्न विचारून संबंधितांना आश्वस्त करीत महापालिका आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच मुकादम यांना सूचना केल्या. तसेच पाणीपट्टीची थकीत रक्कम भरणारे, तसेच नवीन कनेक्शन मागणीचे फॉर्म भरणार्या नागरिकांना तत्काळ नळ कनेक्शन देण्याची अमृत योजनेच्या अधिकार्यांना सूचना करून आदेश दिले.