जळगाव – कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना राबविल्याने जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 11 हजार 813 वरुन 5 हजार 915 पर्यत म्हणजेच निम्म्याने घटली आहे. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण हे सतत वाढते आहे. ही जिल्ह्यासाठी अतिशय दिलासादायक बाब असली तरी नागरीकांनी गाफील न राहता यापुढेही कोरोनाच्या नियमांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
जिल्ह्यात पहिल्या लाटेत सक्रीय रुग्णांची संख्या 12 हजारांच्या आसपास गेली होती. मात्र राज्य शासन व जिल्हा प्रशासनाने लावलेले कडक निर्बध, जिल्हा प्रशासनाने केलेल्या विविध उपाययोजना, माझे कुटूंब, माझी जबाबदारी अभियान व संशयित रुग्ण शोध माहिमेसह पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे मार्गदर्शन, जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्थांचे सहकार्य यामुळे जिल्ह्यात कोरोनाची पहिली लाट थोपविण्यात प्रशासनाला यश आले होते. पहिल्या लाटेत जिल्ह्यातील सक्रीय रुग्णांची संख्या 12 हजारांवरुन 304 (6 फेब्रुवारी, 2021 रोजी) पर्यंत खाली आणण्यात यंत्रणेला यश आले होते. मात्र फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट येण्यास सुरुवात झाली होती. या लाटेत जिल्ह्यात दररोज हजारो बाधित रुग्ण आढळून येत होते. 1 एप्रिल, 2021 रोजी जिल्ह्यातील बाधित रुग्ण संख्या 11 हजार 813 या उच्चांकी पातळीवर पोहोचली होती. मात्र शासनाच्या ब्रेक द चेन अतंर्गत जिल्ह्यातील कोरोनाचे निर्बध अधिक कडक करण्यात आले. शिवाय बाधित आढळणाऱ्या रुग्णांच्या संपर्कातील तसेच संशयित रुग्णांचा शोध घेऊन कोरोनाची लक्षणे दिसून येणाऱ्या व्यक्तींचे स्वॅब घेऊन कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे बाधित रुग्णांचा लवकर शोध लागून त्यांचेवर वेळेत उपचार झाल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण तर वाढलेच शिवाय मृत्युदर रोखण्यातही आरोग्य यंत्रणेला यश आले. सध्या जिल्ह्यात 5 हजार 915 इतके सक्रीय रुग्ण आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत 11 लाख 50 हजार 783 संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी कोरोना विषाणू प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. असून त्यापैकी 1 लाख 39 हजार 827 अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत तर 10 लाख 7 हजार 925 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात सध्या 4 हजार 722 रुग्ण होम क्वारंटाईन असून 212 रुग्ण विलगीकरण कक्षात आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या 5 हजार 915 सक्रीय रुग्णांपैकी 4 हजार 906 रुग्ण लक्षणे नसलेले तर 1 हजार 9 रुग्ण हे लक्षणे असलेले आहेत, अशी माहिती कोविड-19 चे नोडल अधिकारी तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.