मुंबई वृत्तसंस्था – कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी केंद्र सरकारने आज एक योजना जाहीर केल्याची माहिती देऊन मुख्यमंत्री म्हणाले की राज्य ही अशा बालकांसाठी योजना तयार करत असून त्यांचे पुर्ण पालकत्व राज्यसरकार स्वीकारणार आहे. आयुष्याची वाटचाल करतांना ही बालके पोरकी होणार नाही, त्यांच्या प्रत्येक पावलागणिक शासन त्यांच्यासोबत राहील असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
निर्बंध आणि मदत
राज्यातील जनतेची सुरक्षितता ही आपल्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट असल्याने नाईलाजाने निर्बंध लावण्याचा कटु निर्णय घ्यावा लागल्याचे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले की अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत २.७४ लाख मे.टन मोफत अन्नधान्याचे वाटप, ५५ लाखांहून अधिक मोफत शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. सामाजिक न्यायाच्या विविध योजनांसाठी ८५० कोटी हून अधिक रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात आतापर्यंत जमा करण्यात आली आहे. नोंदणीकृत बांधकाम मजुरांना १५५ कोटी ९५ लाख, घरेलू कामगारांना ३४ लाख ४२ हजार रुपयांची रक्कम देण्यात आली आहे. अधिकृत फेरीवाल्यांना करावयाच्या मदतीसाठी ५२ लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. आदिवासी बांधवांना खावटी अनुदानाचे वितरण सुरु आहे. कोविड संदर्भातील उपाययोजना आणि सुविधांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना घोषित ३३०० कोटी पेक्षा अधिक म्हणजे ३८६५ कोटी रुपयांचा निधी दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मदतीचे हे वाटप अजूनही सुरु असल्याची माहिती देतांना त्यांनी महाराष्ट्र सुरक्षित राहावा याचबरोबर गोरगरीबांची आबाळ होऊनये याची काळजी शासनाने घेतल्याचे सांगितले