अमळनेर प्रतिनिधी । शहरातील विवाह करण्याच्या बहाणा करून लूट करणारी टोळीचा पर्दाफाश झाल्याची घटना घडली. यात त्या विवाहितेने १३ जणांशी विवाह करून फसवणूक केली आहे. याप्रकरणी त्या विवाहितेसह तिच्या सोबतच्या टोळींना मारवड पोलिसांनी अटक करण्यात आली आहे.
भूषण संतोष सैंदाणे (रा. मंदाणे ता. शहादा) ह्या युवकाचे हिंगोली येथील सिद्धार्थ नगरातील सोनू राजू शिंदे या युवतीशी ६ मे रोजी लग्न झाले होते. त्यानंतर १५ मे रोजी नवविवाहितेने सासरहून फरार झाली. त्यामुळे १६ मे रोजी पती भूषण सैंदाणे याने शहादा पोलिस स्थानकात पत्नी हरवल्याची तक्रार दिली होती.
संबंधीत तरूणी ही पढावद (ता. शिंदखेडा) येथे प्रवीण शिवाजी पाटील या दुसर्या मुलाशी अमळनेर तालुक्यातील कपिलेश्वर मंदिरावर लग्न करीत असल्याची माहिती शहादा पोलिसांना मिळाली होती. मात्र येथे सध्या लॉकडाऊनमुळे विवाहादी समारंभांना बंदी घालण्यात आली असल्याचे त्यांना कळले. यामुळे हा विवाह नरडाणा जवळच्या मुडावद येथे होत असल्याची माहिती त्यांना मिळाली. येथे फसवणूक करणार्या नवरीसह तिच्या आप्तांना ताब्यात घेण्यात आले. विवाहाच्या नावाखाली लुबाडणुक करण्याचा या टोळींचा धंदा असून यातून आजवर तब्बल १३ जणांना गंडा घालण्यात आल्याची धक्कादायक माहिती यातून मिळाली आहे. मात्र ही कारवाई होत असतांना लग्न जमवून देणारा दलाल, नवरीची आई व भाऊ यांनी पांझरा नदीतून चारचाकी आणि पैसे घेऊन पोबारा केला. तर नवरीचे मामा योगेश संजय साठे (रा. शिवसेनानगर,अकोला), नवरीची मावशी पूजा प्रताप साळवे (रा. सिद्धार्थनगर, हिंगोली) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी शहादा येथील पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.