नागपूर, वृत्तसंस्था । जेष्ठ संगीतकार ‘रामलक्ष्मण’ जोडीतील संगीतकार लक्ष्मण अर्थात विजय पाटील यांचं आज नागपूर येथे निधन झालं आहे. सुरेंद्र हेंद्रे अर्थात राम आणि विजय पाटील अर्थात लक्ष्मण अशी ही ‘राम-लक्ष्मण’ जोडी होती. वयाच्या 79 व्या वर्षी विजय पाटील यांनी अखेरचा श्वास घेतला.
राजश्री फिल्मसच्या ‘एजंट विनोद’ हा या जोडीचा पहिला चित्रपट होता. विजय पाटील मराठीत दादा कोंडके यांच्या चित्रपटांचे संगीतकार म्हणून ते खूप गाजले. आजपर्यंत त्यांनी सुमारे 75 हिंदी, मराठी व भोजपुरी चित्रपटांना संगीत दिलं होतं.
‘पांडू हवालदार’च्या यशानंतर ‘राम राम गंगाराम’, ‘तुमचं आमचं जमलं’, ‘आली अंगावर’, ‘आपली माणसं’, ‘हीच खरी दौलत’, ‘देवता’, ‘लेक चालली सासरला’ अशा अनेक मराठी चित्रपटांना विजय पाटील यांनी संगीत दिलं. यानंतर त्यांनी हिंदीतही त्यांनी आपल्या नावाचा डंका वाजवला.
‘राजश्री’च्या ‘मैने प्यार किया’ला त्यांनी संगीत दिले होते. यातील ‘धून’ खूप गाजल्या. ‘हम आपके है कौन’, ‘हम साथ साथ है’, ‘अनमोल’, ‘सातवा सावन’, ‘हंड्रेड डेज’, ‘पत्थर के फूल’ अशा हिंदी चित्रपटांनाही विजय पाटील यांनी संगीत दिलं.