रत्नागिरी, वृत्तसंस्था । तौक्ते चक्रवादळाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आले आहेत. विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी नव्हे, तर कोकणवासीयांना दिलासा देण्यासाठी चक्रीवादळग्रस्त भागाचा दौरा करत आहे. हेलिकॉप्टरमधून नाही, तर जमिनीवर उतरुन मी पाहणी करायला आलोय, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला. यावेळी, 1 जूननंतर राज्यात लॉकडाऊन वाढणार का, या प्रश्नावरही त्यांनी उत्तर दिले.
कोकणवासीयांना दिलासा देण्यासाठी मी आलो आहे, प्रत्यक्ष पंचनामे झाले की नुकसानीचा अंदाज घेऊन मदतीबाबत निर्णय घेणार, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिले.
शेती आणि फळबाग यांचे पंचनामे दोन दिवसांत करण्याचे आदेशही त्यांनी रत्नागिरी येथे बैठकीदरम्यान दिले.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 21, 2021
तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागांसाठी पॅकेजची घोषणा कधीपर्यंत करणार, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला. त्यावर ‘पॅकेज’वर माझा विश्वास नाही, पण मदतीशिवाय कुणी राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. रत्नागिरीत आढावा बैठक घेतल्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधत होते. त्यावेळी, राज्यातील ब्रेक द चेन आणि लॉकडाऊनसंदर्भातही मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट सांगितले.
”कोरोना कमी होतोय हे नक्कीच, पण त्यासंबंधी काही बोलणार नाही. गेल्या लाटेच्यावेळी आपण अनुभव घेतलाय. गेल्यावेळीही आपण कोरोनावर नियंत्रण मिळवलं होतं. पण, थोडीशी शिथिलता आली अन् कोविड चौपटीने वाढला”, असे म्हणत लॉकडाऊन वाढला जाण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच, सध्याचा विषाणू घातक असून वेगाने पसरत आहे. आपण निर्बंध शिथील करू तेव्हा मागील अनुभवातून शहाणं व्हावं लागेल. सध्या परिस्थिती आटोक्यात असून त्यानुसार लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
फोटोग्राफर असल्याने फोटोसेशन करण्यात रस नाही
केंद्राच्या निकषप्रमाणे मदत लगेचच सुरू करू. एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे निकष बदलण्यावर अद्याप तरी काही निर्णय झालेला नाही. आतापर्यंत ९० ते ९५ टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. पंचनामे पूर्ण होताच मदतीसंदर्भात निर्णय घेतला जाईल. सध्या परिस्थितीचा आढावा घेत आहे. कोणत्या निकषांनुसार मदत करायची याचा निर्णय आढाव्यानंतर घेऊ, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. माझा दौरा चार तासांचा आहे. फोटोसेशन करण्यात मला रस नाही. त्याची गरज मला वाटत नाही. कारण मी स्वत: फोटोग्राफर आहे, असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला.आदित्य ठाकरेंनीही लॉकडाऊनबाबत भूमिका मांडली
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सीएनबीसी या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान राज्यातील लॉकडाऊनसंदर्भात भूमिका स्पष्ट केली. लॉकडाऊन असला तरी, राज्यात महत्वाची कार्यालये, निर्मिती उद्योग, आयात आणि निर्यात सुरू आहे. पण, तुम्ही अनावश्यक गोष्टीसाठी घराबाहेर कधी पडणार, असे विचारत असाल तर ते पूर्पणे रुग्णसंख्येवर अवलंबून आहे, असे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले. कोरोना रुग्णसंख्या किती आहे, यावरच लॉकडाऊन उठवला जावा की वाढवला जावा, ही बाब अवलंबून असणार आहे. आरोग्य आणि सुरक्षा हीच आमची प्राथमिकता आहे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.