नाशिक, वृत्तसंस्था । बुधवारी सकाळी शहर, परिसरासह अनेक भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने पुन्हा झोडपले. मान्सूनपूर्व पावसाने नुकसानीत वाढ होत आहे. १६ ते १८ मे या कालावधीत सोसाटय़ाचा वारा आणि पावसाने २४२ गावांतील चार हजारहून अधिक शेतकऱ्यांना फटका बसला. ७९८ हेक्टरवरील आंब्याचे नुकसान झाले आहे.
मेच्या मध्यावर उकाडय़ाने हैराण झालेल्या जिल्हावासियांना तीन दिवसांपूर्वी म्हणजे रविवारी वातावरणात बदल होऊन दिलासा मिळाला होता. दोन दिवस वादळी वारा आणि पावसाने कमालीचा गारठा निर्माण झाला. मंगळवारी दुपारनंतर पावसाने उघडीप घेतली होती. पण ढगाळ वातावरण कायम होते. बुधवारी पहाटे पुन्हा पावसाला सुरूवात झाली. शहरासह अनेक भागात सलग दीड ते दोन तास संततधार सुरू होती. मागील २४ तासात शहरात १३ मिली मीटर पावसाची नोंद झाली. ग्रामीण भागात कमी-अधिक प्रमाणात त्याने हजेरी लावली.
सलग चार दिवसांपासून होणाऱ्या पावसाने नुकसानीची आकडेवारी वाढत आहे. प्रारंभीच्या तीन दिवसात जिल्ह्यातील २४२ गावांना पावसाची झळ बसली. त्यातील ४०९६ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सर्वाधिक फटका आंब्याला बसला. सुरगाणा (५८१ हेक्टर) आणि पेठ तालुक्यात (२०५) हेक्टर, त्र्यंबकेश्वर (१०) असे ७९८ हेक्टरवरील आंब्याचे नुकसान झाले. या शिवाय ११ हेक्टरवरील भाजीपाला, दोन हेक्टरवरील डाळिंब, १.३८ हेक्टरवरील पेरू असे ८१२.९९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाने अहवालात म्हटले आहे. वादळी वाऱ्यात शेकडो घरांची पडझड झाली. अनेक घरांचे पत्रे उडून गेले. जिल्हा परिषदेच्या शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र यांचेही नुकसान झाले आहे.