जळगाव – मा. न्यायालयाकडील 26 एप्रिल, 2021 रोजीच्या निर्देशास अधीन राहून तसेच दिनांक 12 ते 14 मे, 2021 या कालावधीत रमजान ईद (ईद-उल-फितर) व अक्षयतृतीया या सणानिमित्त जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी विशेष निर्बंधामध्ये सुट दिली आहे.
दिनांक 12 ते 14 मे, 2021 या कालावधीत सकाळी 7.00 ते सकाळी 12.00 वाजेपर्यंत किराणा दुकाने, ड्रायफ्रुटस दुकाने, भाजीपाला, फळविक्री, अंडी/चिकन/मटन/मासे विक्रीची दुकाने, बेकरी, दुध विक्री केंद्रे सुरु राहतील. सणानिमित्त एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये याकरीता नागरिकांनी आपल्या प्रभागातील/वार्डातील दुकानातून खरेदी करावी. शक्यतो होम डिलिव्हरीस प्राधान्य देण्यात यावे व खरेदीसाठी जातांना नागरिकांनी शक्यतो वाहनाचा वापर टाळावा. दुकान मालक/चालक यांनी दुकानामध्ये एका वेळेस 5 पेक्षा जास्त ग्राहकांना प्रवेश देऊ नये, तसेच दुकानासमोर गर्दी होऊ नये याकरीता दुकानासमोर वर्तुळ तयार करुन नागरिकांना सोशल डिस्टन्सींगचे पालन करण्याबाबत सूचित करावे.
या बाबींसाठी देण्यात आलेल्या सुटमध्ये दुकानदार व नागरिक यांनी कोविड-19 नियमावलीचे पालन करावे. तसेच नियमांचे उल्लघंन करणाऱ्या आस्थापना, नागरिक यांचेवर स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस विभाग यांनी संयुक्तरित्या कारवाई करावी. या बाबी व्यतिरिक्त 22 व 30 एप्रिल, 2021 अन्वये लागू करण्यात आलेले निर्बंध कायम राहतील.
या आदेशाचे उल्लघंन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 व फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. असे अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांनी आदेशात म्हटले आहे.