जळगाव – येथील शिवाजी नगरातील डी.बी जैन रुग्णालयात लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांकडून सोशल डिस्टंन्सीगचा फज्जा उडाला असल्याचे दिसून आले. तसेच नागरिक लसीकरणासाठी नंबर लवकर लागावे या आशेने पहाटे ४ वाजेपासून केंद्रावर येतात तसेच याठिकाणी पिण्याच्या पाण्याची तसेच शौचालयाची ही सोय नसल्याने त्यांचे हाल होत आहे त्यामुळे जळगाव शहरातील सर्व प्रभागात लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी नगरसेवक नवनाथ विश्वनाथ दारकुंडे यांनी आयुक्त यांच्याकडे केली आहे.
पहाटे पासून केंद्रावर गर्दी
वयोवृद्ध नागरीक सकाळपासून लसीकरणासाठी केंद्रावर येत आहे तसेच याठिकाणी नागरिकांसाठी मोठ्याप्रमाणात गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे या गर्दीत सोशल डिस्टंसिंग चे कुठलेही पालन होत नाही यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता नाकारता पण येत नाही तसेच पिण्याच्या पाण्याची व शौचालयाची ही याठिकाणी सोय नसल्याने नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
जळगाव शहरात एकूण १९ प्रभाग आहेत आणि या १९ प्रभागातील सर्व नागरिकांचा ओढा शिवाजीनगर डी बी जैन रुग्णालयाकडे होत आहे. तरी सर्व प्रभागात लसीकरण केंद्र सुरू केले तर एकाच ठिकाणी होणारी नागरिकांची गर्दी विभागली जाईल आणि लसीकरण करणेही सुलभ होऊ शकते. कारण शिवाजीनगर प्रभागात असलेले डी बी जैन रुग्णालयात जळगाव शहरातील दूरदूरच्या प्रभागातून वयोवृद्ध नागरीकांना लसीकरणासाठी यावे लागत आहे. डिस्टंसिंग चे कुठलेही प्रकारचे पालन होताना दिसत नाही आहे. परिणामी या गर्दीत एकमेकांना कोरोना ची लागण होण्याची दाट शक्यता दिसून येते आणि या रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे पुरेसे मनुष्यबळही नसल्यामुळे गर्दी नियंत्रित करणे खूपच त्रासदायक होत असल्याची तक्रार नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी केली.


