नवी दिल्ली, वृत्तसंस्था – भारतासाठी आनंदाची बातमी आहे. रशियन लस स्पुतनिक-V शनिवारी भारतात दाखल झाली आहे. ही लस कोरोना व्हायरस विरोधात 90 टक्क्यांहून अधिक प्रभावी असल्याचे बोलले जाते. लसीकरण कार्यक्रमाची गती वाढविण्यासाठी केंद्र सरकारने नुकतीच स्पुतनिक -V वापराची परवानगी दिली होती.
स्पुतनिक-V ची एफिकसी (प्रभाव) जगातील अनेक लशींपेक्षा अधिक आहे. तसेच ही लस कोरोनाच्या नव्या स्ट्रेनविरोधातही प्रभावी आहे. याचे लोकल प्रोडक्शनही लवकरच सुरू होईल. ते नियोजनबद्ध पद्धतीने वाढवून दरवर्षी 850 मिलियन (85 कोटी) डोसपर्यंत नेले जाईल. स्पुतनिक-V ही 11 ऑगस्ट, 2020 रोजी रशियाने नोंदणी केलेली जगातील पहिलीच कोरोना लस आहे. ही लस गमालेया नॅशनल रिसर्च सेंटर ऑफ एपिडेमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीने विकसित केली आहे.
लसीकरणाचा वेग वाढणार –
भारतात 18 ते 44 वर्ष वयोगटातील लोकांसाठी तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. तिसऱ्या टप्प्यावरील लसीकरणासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन नोंदणी केली आहे. मात्र, अनेक ठिकाणी लशींच्या कमतरतेमुळे लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला आज सुरुवात होऊ शकली नाही. मात्र, आता रशियन लस आल्याने लसीकरण कार्यक्रमाला गती मिळण्याची आशा आहे.
Sputnik-V vaccine will add to India’s arsenal to fight the pandemic. This third option will augment our vaccine capacity & accelerate our vaccination drive. This is the 1st consignment of 1.5 lakh doses of Sputnik-V vaccine with millions of doses to follow: MEA
— ANI (@ANI) May 1, 2021
अशी आहे भारताची स्थिती –
मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी कोरोना रुग्णांच्या आकडेवारीनं नवा विक्रम केला आहे. देशात पहिल्यांदा एकाच दिवसात कोरोनाचे 4 लाखाहून अधिक रुग्ण सापडले आहेत. गेल्या 24 तासांत देशात 4 लाख 1 हजार 993 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 3 हजार 523 जणांचा मृत्यू झाला. गेल्या 24 तासांत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 2 लाख 99 हजार 988 इतकी आहे.कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 91 लाख 64 हजारच्या पुढे –
देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 91 लाख 64 हजार 969 वर जाऊन पोहोचली आहे. यापैकी 1 कोटी 56 लाख 84 हजार 406 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 2 लाख 11 हजार जणांचा मृत्यू झाला. सध्याच्या घडीला देशात 32 लाख 68 हजार 710 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाची लागण होणाऱ्यांचे प्रमाण दिवसागणिक वाढत असल्याने रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे. अनेक राज्यांमधील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.