मुंबई, वृत्तसंस्था – राज्यातील १८ ते ४४ या वयोगटातील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस मोफत देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची घोषणा केली.
लसीकरण कार्यक्रमाबाबत आरोग्य विभाग नियोजन करीत असून नागरिकांना याबाबत व्यवस्थित पूर्वसूचना देण्यात येईल, त्यामुळे लसीकरण केंद्रांवर अनावश्यक गर्दी करू नये असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की गेल्या वर्ष-सव्वा वर्षांपासून आपण कोविडची लढाई लढतो आहोत. जानेवारीपासून केंद्राच्या सहकार्याने राज्यात लसीकरण सुरु आहे. आजतागायत ४५ च्या पुढील वयोगटातील दीड कोटीपेक्षा जास्त जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. हा देशात विक्रम आहे.
लस पुरवठ्याप्रमाणे लसीकरण कार्यक्रम घोषित करणार
उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच इतर सर्व प्रमुख सहकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा झाली आहे. सध्या राज्यसमोर आर्थिक चणचण असूनही नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य आहे त्यामुळेच १८ ते ४४ च्या वयोगटातील सर्वांना मोफत लस देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून लसींचा पुरवठा कसा होतो, यानुसार लसीकरण नियोजन करून पुढील कार्यक्रम जाहीर करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हणाले.
जास्तीत जास्त लस मिळविण्याचे प्रयत्न
सध्या सिरम आणि भारत बायोटेक या कंपन्यांच्या लसी उपब्ध असून, त्यांच्याशी सातत्याने चर्चा करून, पाठपुराव्याने जास्तील जास्त लस उपलब्ध करून देण्यात येईल.
उत्तम नियोजन करावे
18 ते 44 वयोगटातील लसीकरण कार्यक्रमाचे नियोजन करताना कुठलीही अडचण येणार नाही याची काळजी घेण्याची मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला सूचना केली आहे
कोविन एपवर नोंदणी करा
या वयोगटातील नागरिकांनी कोविन मोबाईल एपवर नोंदणी करावी, कुठेही लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये. लसीकरणाबाबत व्यवस्थित व सुस्पष्ट सूचना मिळतील असेही मुख्यमंत्री म्हणतात.
आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत १८ ते ४४ या वयोगटातील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याचा निर्णय घेण्यात आला.#BreakTheChain pic.twitter.com/7JwMj3FbKo
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 28, 2021
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग हाफकिनला कोविड लस प्रकल्प सुरू करण्यास मान्यता
हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळास कोविड लस प्रकल्प सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैव तंत्रज्ञान विभागाच्या सहाय्याने आणि मे.भारत बायोटेक इंटरनॅशनल लि., हैद्राबाद या कंपनीकडून कोविड-19 या साथ रोगाच्या लसीचे उत्पादन तंत्रज्ञान घेऊन महामंडळाच्या परळ, मुंबई येथील जागेत रूपये 154 कोटी भांडवली खर्चाच्या कोवॅक्सिन लस उत्पादनाचा हा प्रकल्प सुरू होईल.
प्रकल्पाच्या उभारणीसाठी रूपये 94 कोटी इतके अर्थसहाय्य राज्य शासनाच्या आकस्मिकता निधीतून खर्च करण्यात येईल. केंद्र शासनाने रूपये 65 कोटी इतके अर्थसहाय्य मंजूर केले आहे.
माजी राज्य मंत्री एकनाथ गायकवाड यांना मंत्रिमंडळाची श्रद्धांजलीराज्याचे माजी राज्य मंत्री, माजी संसद सदस्य, ज्येष्ठ नेते एकनाथ महादेव गायकवाड यांच्या निधनाबद्धल आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी शोकप्रस्ताव वाचताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यातील समाजकारण-राजकारणातील दोन पिढ्यांसाठीचे मार्गदर्शक असे नेतृत्व आपण गमावले आहे. एकनाथ गायकवाड यांनी राजकारण आणि समाजकारणाचा समतोल साधत, पुढच्या पिढीसाठीही मार्गदर्शक अशा कामाचा आदर्श घालून दिला अशा शब्दांत मंत्रिमंडळाच्या भावना व्यक्त केल्या.
समाजकारण-राजकारणातील दोन पिढ्यांचे मार्गदर्शक असे ज्येष्ठ नेतृत्व माजी राज्यमंत्री, माजी खासदार एकनाथराव गायकवाड यांच्या निधनामुळे हरपले आहे. त्यांच्या नेतृत्वाची पोकळी जाणवत राहील. एकनाथजी गायकवाड यांना श्रद्धांजली
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 28, 2021