पहूर. ता जामनेर- डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून पहूर येथे कंटेनर सर्वेक्षण अभियान राबवण्यात येत असून या अभियानास आज गुरुवारी (ता. २९ ) जिल्हा हिवताप नियंत्रण अधिकारी डॉ. अपर्णा पाटील , तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी भेट देवून पाहणी केली . प्रारंभी आरोग्य उपकेंद्रात त्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले .
वाकोद प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येथे कंटेनर सर्वेक्षण अभियान तीन दिवस राबवण्यात येणार असल्याचे जिल्हा हिवताप नियंत्रण अधिकारी डॉ. अपर्णा पाटील यांनी यावेळी सांगितले, तसेच नागरिकांनी काळजी घ्यावी , डास होऊ नये यासाठी आपला परिसर स्वच्छ ठेवावा . तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी सांगितले की, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा , पूर्ण अंग झाकले जाईल असे कपडे घालावेत .
शक्यतो मच्छरदाणीचा उपयोग करावा. याप्रसंगी तालुका हिवताप पर्यवेक्षक व्ही. एच. माळी ,पहूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र वानखेडे , वाकोद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अंगणवाडी संघटनेच्या पदाधिकारी सुषमा चव्हाण यांचा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनवणे यांनी सत्कार केला.
या अभियानात आरोग्य पर्यवेक्षक अशोक सुरडकर , आरोग्यसेवक आर. बी. पाटील, आर.व्ही. भिवसने, बी. बी. काटकर, आर. एन. वाणी , आर. एन. मोरे , यू.पी. चव्हाण , ज्योती चौधरी , संगीता सोनवणे, संगीता पवार ,माधुरी पाटील, विजय पांढरे यांच्यासह आशासेविका सहभागी झाल्या असून प्रत्येक घरी भेट देत पाण्याच्या टाक्यांमध्ये अबेटिंग मिसळण्यात येत आहे. जास्त दिवसांचे पाणी असल्यास पाण्याचे टाक्या रिकाम्या करून त्या एक दिवस कोरड्या ठेवण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे .या अभियानास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे .