जळगाव – मुद्रांक विभागामार्फत मुद्रांक शुल्क सवलत योजना जाहीर करण्यात आली होती. त्यास अनुसरून पक्षकारांनी बऱ्याच प्रमाणात या सवलतीचा फायदा डिसेंबर 2020 पर्यंत घेऊन मुद्रांक शुल्क खरेदी करून दस्त निष्पादित करून ठेवले आहेत. नोंदणी अधिनियमाच्या कलम 23 प्रमाणे निष्पादित केलेले दस्त पक्षकारांना दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये निष्पादनाच्या दिनांकापासून चार महिन्यात दाखल करणे बंधनकारक आहे.
अन्यथा अशा दोस्तांना कलम 25 प्रमाणे पुढील चार महिन्यांमध्ये नोंदणीच्या अनुक्रमे अडीच, पाच, साडेसात व दहापट एवढी मोठी शास्ती भरावी लागेल. पक्षकारांना शास्तीची रक्कम भरावी लागू नये म्हणून नोंदणी महानिरीक्षक, पुणे यांच्या 6 एप्रिलच्या पत्रकान्वये देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करण्याच्या अटीवर 31 डिसेंबर, 2020 पर्यंत निष्पादित केलेल्या दस्ताची नोंद करण्यास पक्षकारांनी उपस्थित राहणे हे वैध कारण असल्याचे समजण्यात यावे. व त्याकरिता दुय्यम निबंधक कार्यालयाकडून देण्यात आलेले दिनांक व वेळेचे पात्र ग्राह्य धरण्यात यावे असे महसुल व वन विभागाचे अवर सचिव श्रीरंग घोलप यांनी पत्रकान्वये कळविले आहे.
राज्यात कोविड-19 विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात होण्याचा धोका असल्याने कोरोना संक्रमणाची साखळी खंडित करण्यासाठी महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन यांच्या आदेशान्वये निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात कलम 144 व रात्रीची संचारबंदी लागू केली असल्याने वैध कारणांशिवाय कोणालाही सार्वजनिक ठिकाणी ये-जा करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना सार्वजनिक ठिकाणी कार्य, (व्यवहार) सेवा यांना बंदी घालण्यात आली आहे. केंद्र, राज्य व स्थानिक प्रशासनाची कार्यालये त्यांच्या संबंधित प्राधिकरणे व संघटना यांची कार्यालये सुरू ठेवण्यास सूट दिलेली आहे. त्याअनुषंगाने नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अधिनस्त असलेले दुय्यम निबंधक कार्यालयेही सुरू ठेवण्यात आली आहेत.
तरी डिसेंबर 2020 पर्यंत या सवलतीचा फायदा घेऊन मुद्रांक शुल्क खरेदी करून दस्त निष्पादित करून ठेवलेल्या नागरीकांनी कोरोना निर्बधांच्या नियमावलीचे पालन करुन 30 एप्रिलपूर्वी आपले दस्त नोंदवून घ्यावे, असे आवाहन सुनील पाटील, सह जिल्हा निबंधक वर्ग-2, जळगाव यांनी केले आहे.