रायपूर, वृत्तसंस्था : छत्तीसगडमध्ये तीन दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांकडून अपहरण झालेल्या पोलीस जवानाची त्यांनी हत्या केल्याची बाब उघडकीला आली आहे. मुरली ताटी असे या हत्या झालेल्या पोलिसाचे नाव असून ते छत्तीसगड पोलीस दलात उपनिरीक्षक होते.
मुरली ताटी पलनार येथील आपल्या घरी आले असताना 21 एप्रिल रोजी त्यांचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर आज त्यांचा मृतदेह बिजापूर जिल्ह्यातील गंगलूर येथे आढळून आला. त्यांच्या मृतदेहाशेजारी नक्षलवाद्यांनी एक चिठ्ठी लिहिलेली आढळून आली आहे. त्यात नमूद करण्यात आले आहे की, लोकांच्या न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली गेली आहे.
छत्तीसगडमध्ये अलीकडेच नक्षलवाद्यांनी 22 सुरक्षा जवानांची हत्या केली होती. त्यानंतरही त्यांचा हा आक्रमकपणा अजून सुरू असून त्यांना लगाम घालण्यास सुरक्षा दलांना अपयश आले आहे.