जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गुरुवारी सकाळी अधिष्ठाता डॉ. जपप्रकाश रामानंद यांनी ऑक्सिजन समितीचा आढावा घेऊन ऑक्सिजन पुरवठा यंत्रणा सक्षम असल्याबाबत समाधान व्यक्त केले.
सकाळी ११ वाजता ऑक्सिजन समितीतील सदस्य डॉ. इम्रान तेली, संजय चौधरी यांनी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना ऑक्सिजन टॅंकजवळ नेऊन टॅंक कसा वापरला जातो, त्याची दैनंदिन तपासणी कशी होते याबाबत माहिती दिली. तसेच रुग्णालयातील विविध वॉर्डात ऑक्सिजन पुरवठा कसा होतो, ऑक्सिजन पाईपलाईनचे कामकाज कसे चालते त्याचीदेखील माहिती अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी घेतली.
ऑक्सिजन समितीच्या मदतीसाठी २ तंत्रज्ञ व ८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती झालेली आहे. हि टीम कायम ऑक्सिजन पुरवठ्यावर नजर ठेऊन तो सुरळीत करीत असल्याबाबत प्रात्यक्षिक अधिष्ठाता डॉ. रामानंद यांना दाखविण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येक वॉर्डात सिलेंडर लावण्यात आलेले आहेत. तसेच रुग्णालयातील ऑक्सिजन विभागाच्या तीन युनिटमध्ये ठेवलेल्या साधे व जम्बो ऑक्सिजन सिलेंडर हाताळणीची कार्यप्रणाली तंत्रज्ञांनी अधिष्ठातांना दाखविली.
ऑक्सिजन पुरवठा यंत्रणा व नियोजन चोख असल्याबाबत अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी समाधान व्यक्त केले.