जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील कुसुंबा परिसरात दाम्पत्याचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली.
कुसुंबा शिवारातील कॉलनी परिसरात रहिवासी असणारे मुरलीधर राजाराम पाटील व त्यांची सौभाग्यवती आशा मुरलीधर पाटील या प्रौढवयीन दाम्पत्याचे मृतदेह त्यांच्या घरात आज दुपारच्या सुमारास आढळून आले. यापैकी आशा मुरलीधर पाटील (वय ४७) यांचा मृतदेह तळ मजल्यावरील मागच्या रूममध्ये आढळून आला आहे. तर त्यांचे पती मुरलीधर राजाराम पाटील (वय५४) यांचा मृतदेह हा वरील मजल्यावरच्या रूममध्ये असल्याचे निदर्शनास आले आहे.
या दोन्ही पती-पत्नीच्या अंगावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा असून यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची प्रथमदर्शनी माहिती पोलिसांना मिळाली आहे. कुणी चोरीच्या उद्देश्याने घरात येऊन त्यांचा झटापटीत खून केला याची माहिती मात्र अद्याप मिळालेली नाही. याची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्यात आला आहे. तर अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी व सहायक पोलीस अधिक्षख कुमार चिंथा यांनी देखील घटनास्थळाची पाहणी केली आहे.