जळगाव – सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता घरच्या घरी तपासण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वत:कडील असलेले सोयाबीन बियाण्याची चाळणी करुन त्यामधील काडी कचरा, खडे, लहान/ खुरटलेले बियाणे वेगळे करावे. चाळणी नंतर स्वच्छ झालेले एका आकाराचे बियाणे उगवण क्षमता चाचणीसाठी निवडावे. पेपराचा एक कागद घेऊन त्याचा चार पट्ट्या पाडाव्यात त्यामुळे कागदाची जाडी वाढेल. नंतर तो पुर्ण कागद ओला करावा. प्रत्येकी 10 बिया घेऊन त्या एका रांगेत समान अंतरावर ठेऊन पेपराच्या टोकाच्या भागावर ठेऊन त्याची गुंडळी करावी. अशारितीने 100 बियांच्या 10 गुंडळ्या तयार कराव्यात. नंतर या गुंडाळ्या पॉलीथीन पिशवीत चार दिवस तशाच ठेवाव्यात. चार दिवसानंतर त्या हळुहळु उघडुन पाहुन त्यामध्ये बिजांकृत झालेल्या बिया मोजाव्यात. जर ती संख्या 60 असेल तर उगवण क्षमता 60 टक्के आहे असे समजावे. जर ती 80 असेल तर उगवण क्षमता 80 टक्के समजावी. अशा पद्धतीने घरच्या घरी उगवण क्षमतेचा अंदाज घेता येतो. सोयाबीन बियाण्याची उगवणक्षमता चांगली म्हणजे 70 टक्के पेक्षा जास्त असेल तर शिफारस केल्याप्रमाणे पेरणीसाठी 75 किलो बियाणे वापरावे.
उगवण क्षमता 70 टक्के पेक्षा कमी असल्यास त्याप्रमाणे अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरावे. सोयाबीन हे स्वपरागसिंचीत पीक असल्याने पेरण्यात येणारे बियाणे सरळ वाणाचे आहेत. त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. मागील दोन वर्षात पेरणी केलेल्या प्रमाणित बियाण्यांपासून उत्पादित होणारे सोयाबीन हे बियाणे म्हणुन शेतकऱ्यांनी वापरल्यास उत्पादन खर्च कमी होऊ शकतो.
सोयाबीन बियाणे हे अधिक संवेदनशील आहे. साठवणुक व हाताळणी दरम्यान तापमान आणि हवेतील आद्रतेचा बियाण्याच्या उगवण क्षमतेवर परिणाम होतो. त्याकरिता उगवणक्षमतेची चाचणी पेरणीच्या एक अथवा दोन आठवडे पूर्वी करावी.
याबाबत शेतकरी बांधवाना काही समस्या असल्यास कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांचेशी संपर्क साधावा. असे संभाजी ठाकुर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.