जळगाव – शहरातील मनपा कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणाबाबत तक्रारी असल्याचे माध्यमातून समजले होते. कोविड केअर सेंटरमध्ये जाऊन स्वतः दर्जा तपासला असता तो चांगला आढळून आला. रुग्णांशी चर्चा केली असता काही रुग्णांनी तिखट, मीठबाबत तक्रार केल्याने तशा सूचना मक्तेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या असल्याचे महापौर जयश्री महाजन यांनी सांगितले.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील मनपा कोविड केअर सेंटरला भेट देत महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी पाहणी केली. यावेळी नगरसेवक किशोर बाविस्कर, चेतन सनकत, कुंदन काळे, डॉ.विजय घोलप आदी उपस्थित होते.
महापौरांनी घेतली जेवणाची चव
कोविड सेंटरमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणाची तक्रार असल्याने महापौर जयश्री महाजन यांनी जेवणाचा आस्वाद घेतला. जेवणाची चव आणि दर्जा उत्तम असल्याचे त्यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांनी तक्रारीकडे लक्ष द्यावे
मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये असलेल्या रुग्णांशी महापौर, उपमहापौर यांनी चर्चा केली असता काही रुग्णांनी जेवणाच्या तिखट, मीठ चवबाबत तक्रार केली. कोविड केअर सेंटरमध्ये काहीही तक्रार असल्यास संबंधित डॉक्टर आणि समन्वय अधिकाऱ्यांना कळवावे असे आवाहन महापौर जयश्री महाजन यांनी केले. तसेच मनपा अधिकाऱ्यांनी रुग्णांच्या तक्रारीकडे लक्ष द्यावे आणि त्वरित मार्गी लावाव्या अशा सूचना महापौर जयश्री महाजन यांनी केल्या.