जळगाव – वर्षभरापासूनची कोरोनाची भयंकर परिस्थिती,लॉकडाऊन यामूळे अनेकांचे उद्योगधंदे,व्यवसाय बुडाले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या,बेरोजगारीची वेळ आली. सर्वसामान्यापासून सर्वांनाच या समस्येची झळ बसली. यामुळे अनेकांना आर्थिक हानी सहन करावी लागली. तसेच या संकटामुळे अनेकजण कर्जबाजारी झाले. मानसिक त्रासामुळे अनेकांनी आत्महत्याही केल्या. अशा परिस्थितीत एका घटकाला मात्र आपण दुर्लक्षित केले आणि तो घटक म्हणजे लहान – निरागस कोवळी मुले.
आज वर्ष होऊन गेलं तरीही हे कोरोनाचे भयाण संकट ओसरण्याच नाव घेत नाही. यामुळे या चिमुकल्यांच्या शाळा तर बंद आहेतच त्याबरोबर ही मुलं घरात कोंडली गेलेली आहेत. जणू त्यांना घरात जबरदस्तीने डांबून ठेवले गेले आहे. अशी त्या चिमुकल्यांची स्थिती झाली आहे. ना कुठं फिरायला नाही ना कुठं खेळायला नाही. मास्क आणि चार भिंतीच्या आतमध्ये या मुलांचा जीव घुसमटून गेलाय.
खेळण्या-बागडन्याच्या या वयामध्ये या मुलांना मुक्त श्वास घेणे अवघड झालेले आहे. चोवीस तास नोकरी – उद्योग – व्यवसायामध्ये गुरफटून जाणारे पालक आज मुलांजवळ असूनही मुलांच्या या समस्येचे उत्तर त्यांच्याजवळ नाही. पालकांचे मुलांजवळ असणे हे जरी नितांत गरजेचे असले तरी मुलांना भावनिक आणि मानसिक आधार गरजेचा आहे.
बहुतांश पालकांना आज मुलांच्या शिक्षणाची चिंता लागली आहे. शाळा कधी सुरू होतील याची घाईगडबड लागली आहे. पण मुलांची घुसमट मात्र कुणीही समजून घ्यायला तयार नाही. मुलं आज ना उद्या शाळेत जातीलही पण त्यांच्या मानसिक आणि भावनिकतेवर दूरगामी परिणाम होतील त्याच काय…? मुलांची भावनिक सुरक्षितता महत्वाची की शाळा सुरू होण्याचा आततायीपणा महत्वाचा याचा प्रत्येक पालकाने गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.
मग आमची जबाबदारी काय…? आम्हांला काय करायला हवं…? आमच्या कामधंद्यातून जेवढा वेळ मिळेल तेवढा देतोच की आम्ही मुलांना. वेळ देता पण कसा देता…? मुलगा दिवसदिवसभर टी.व्ही., मोबाईल, वर काय बघतो…? दिवसभर मुलगा किंवा मुलगी काय करते हे माहीत असतं आम्हांला…? याच नव्वद टक्के उत्तर नाहीच येतं. त्यामुळे मुले बेफिकीर वागतात, आई – वडील आम्ही काय करतो हे आम्हांला विचार नाहीत, याच गोष्टीचा ते गैरफायदा घेतात.
यातून मुलं एकलकोंडी व चिडचिड करतात
त्रागा करतात. पालक,समाज यापासून मुलं तुटतात. मुलांच्या मनामध्ये वाईट – नको नको असे आत्महत्येसारखे विचार मनामध्ये घोंगावतात. याची उदाहरणे आपण समाजामध्ये बघत – ऐकत आहोत. अनेक मुले मनोरुग्ण झालेली आपणास पहायला मिळतात. याला सर्वस्वी जबाबदर कोण…? याचे आत्मचिंतन प्रत्येक पालकाने करावे. आज कोरोनासारख्या महामारीच्या पार्श्वभूमीवर मुलं चोवीस तास घरात असताना पालकांनी मुलांशी बोलणे,संवाद साधने महत्वाचे आहे. मुलांबरोबर खेळणे,गप्पा मारणे, मुलांना दिवसभराचे जेवण सोबत घेऊन जेवणे, मुलांना विश्वासात घेणे, मुलं आज दडपणाखाली जीवन जगत असताना,कोरोनाची भीती मनात घर करुन बसली असताना मुलांवर अपेक्षांचे ओझे लादू नये. मुलं आज चोवीस तास घरी आहेत म्हणून चोवीस तास अभ्यास आणि घोकंपट्टीचा ससेमिरा नको.
आजच्या घडीला आजी – आजोबांचे कुटुंबामध्ये असणे आणि त्यांचे संस्कार मुलांवर रुजवले जाणे काळाची गरज आहे. मुलांना भावनिक व मानसिक आधार देऊन त्यांच्याशी संवाद साधत राहणे, गोष्टी सांगणे, मुलांसाठीच्या विविध कथेच्या पुस्तकांचे वाचन करणे व स्वतः मुलांना करायला लावणे हे काम नित्यनियमाने करणे गरजेचे आहे. आज मुलं आनंदी,हसतखेळत,तणावमुक्त राहणे आवश्यक आहे. मुलांना धीर देऊन प्रेम, आत्मीयता,आपुलकीने त्यांची मने जिंकणे काळाची गरज आहे.
चला कोमेजल्या काळ्यांना पुन्हा फुलवूया
पंखांना त्यांच्या नवे बळ देऊया
लेखन
परशुराम माळी
शिक्षक
अनुभूती स्कूल, जळगाव