जळगाव – कोरोनामुळे शुक्रवारी रात्री मृत्यू झालेल्या महिलेला अंत्यसंस्कारासाठी घेवून जाणार्या शववाहिका चालकाची अचानक तब्येत बिघडल्याने तो चक्कर येवून पडला. घटनेचे गांभीर्य लक्षात तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील मृत्यू समन्वय समितीचे (डेथ कॉर्डिनेशन समिती) सदस्य तथा वरिष्ठ लिपीक विलास वंजारी यांनी स्वतः शववाहिका चालवली. त्यामुळे मृतदेहावर वेळेवर नेरी नाका येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार होऊ शकले. याबद्दल नातेवाईकांनी त्यांचे आभार मानले.
कोरोनाबाधित मृतदेह नेरी नाका येथे स्मशानभूमीत नेण्यासाठी नातेवाईकांना मदत म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून एक शववाहिका मिळाली आहे. त्यावर चालक म्हणून चंद्रकांत पाटील (रा.खोटेनगर) हे शुक्रवारी १६ रोजी कार्यरत होते. त्याचवेळी कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या 45 वर्षीय महिलेचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास न्यायचे नातेवाईकांनी सांगितले.
मात्र, त्यावेळी शववाहिका चालक चंद्रकांत पाटील यांची अचानक तब्येत बिघडल्याने ते चक्कर येवून पडले. याबाबत माहिती मिळताच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील मृत्यू समन्वय समितीचे सदस्य विलास वंजारी यांनी चालकास प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तसेच रात्री नातेवाईकांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी स्वतःशववाहिका चालऊन नेरी नाका स्मशानभूमीत मृतदेह आणला. या निर्णयामुळे मृतावर रात्री वेळेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यामुळे मृताच्या नातेवाईकांनी वंजारी यांचे आभार मानले आहे.