मुंबई, वृत्तसंस्था । शिक्षण हक्क कायद्यानुसार राज्यातील खासगी शाळांमध्ये राखीव असलेल्या 25 टक्के कोटा प्रवेशाची यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली. पुणे जिह्याचा अपवाद वगळता राज्यातील 67 हजार 459 तर मुंबईतील 4 हजार 985 विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरले आहेत.
राज्यातील 9 हजार 432 शाळांमध्ये 25 टक्के कोटय़ाच्या 96 हजार 684 जागा उपलब्ध होत्या. या जागांवरील प्रवेशासाठी तब्बल 2 लाख 22 हजार 267 पाल्ल्यांचे ऑनलाइन अर्ज आले होते. यापैकी केवळ 67 हजार 459 विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरल्याने अद्याप 29 हजार 225 जागा शिल्लक आहेत. तर प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 42 हजार 535 इतकी आहे. यंदा प्रवेशाची एकच लॉटरी काढण्यात येणार असल्याने रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश कसे देणार याविषयी अद्याप धोरण निश्चित झालेले नाही.
मुंबईतील 352 खासगी शाळांमध्ये आरटीई प्रवेशासाठी नर्सरी आणि पहिलीच्या एकूण 6 हजार 463 जागा उपलब्ध होत्या. या जागांवर प्रवेशासाठी 12 हजार 911 पाल्ल्यांचे अर्ज आले होते. प्रवेश पात्र विद्यार्थ्यांची संख्या 4 हजार 985 इतकी आहे.