जळगाव – आंतरराष्ट्रीय पातळीवर समाजसेवेसाठी ख्यातीप्राप्त संस्था रोटरी क्लबच्या प्रांत 3030 ने विविध क्षेत्रातील बहुमूल्य कामगिरी करणार्या महणीय व्यक्तिमत्वांची यादी जाहीर केली असून, ह्या लोकांनी केलेल्या अतुलनीय कामगिरी बद्दल प्रांत 3030 चे प्रांतपाल रो. शब्बीर शाकिर यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाइन कार्यक्रमाच्या माध्यमातून दिनांक 13 एप्रिल रोजी या सर्व व्यक्तिमत्वांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.
आपल्या भुसावळकरांसाठी अत्यंत गौरव आणि आनंदाची बाब म्हणजे भुसावळ निवासी रोटरी क्लब भुसावळचे ज्येष्ठ सदस्य रो.पांडुरंग राव यांचेही नाव ह्या यादीत समाविष्ट असून, रोटरी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. रोटरीचा चालता बोलता ज्ञानकोश महणून ओळखले जाणारे आणि आपल्या प्रशासनिक आणि बौद्धिक क्षमतांनीशी अनेक क्लिष्ट बाबींचा गुंता सोडवण्यात वाकबगार असणारे तीक्ष्ण बुद्धीचे व्यक्तिमत्व म्हणून श्री. पांडुरंग राव यांच्याकडे पहिले जाते. पांडुरंग राव यांनी रोटरी आणि सामाजिक क्षेत्रात दिलेल्या बहुमूल्य योगदांनाबद्दल हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. सहा दशकांहून अधिक काळ रोटरी सेवेसाठी समर्पित हे व्यक्तिमत्व म्हणजे मूर्ति लहान आणि कीर्ति महान ह्या उक्तीचा सार्थप्रत्यय आहे. या आधीही पांडुरंग राव यांना रोटरी इंटरनॅशनलचे अध्यक्ष विल्फ्रेड विल्किन्सन यांच्या हस्ते द सिग्निफिकंटिव्ह अचिव्हमेंट अवॉर्ड हा रोटरी अत्यंत मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. 85 वर्षाचे पांडुरंग राव रोटरी मंडळांमध्ये रोटरीचे भीष्म पितामह म्हणून ओळखले जातात. आपल्या दीर्घ कारकीर्दीदरम्यान त्यांनी रोटरी मधील सगळी महत्वाची पदे भूशवलेली असून रोटरी क्लबचा सर्वात तरुण अध्यक्ष बनण्याचा विक्रम सुद्धा त्यांचाच आहे. पांडुरंग राव म्हणजे रोटरी नियमांच्या अधिकारवाणीने व रोटरीच्या इतिहासाचा साक्षेपी दृष्टीने अभ्यास करून समृद्ध मार्गदर्शन करणारा एक भक्कम आधारस्तंभ आहेत. पांडुरंग राव यांनी 25 वर्षांहून अधिक वर्षे कोषाध्यक्ष (जो एक रोटरी विश्वविक्रम असू शकतो) पद भूषवले आहे आणि 30 पेक्षा जास्त वर्षे ते क्लब बुलेटिनचे संपादक राहून चुकलेले आहेत. त्यांनी क्लब निगडीत सर्व महत्त्वाची पदे भूशवली आहेत. जिल्हास्तरावर त्यांनी अनेक जिल्हा समित्यांचे अध्यक्ष व सदस्य म्हणून विविध पदांवर कार्य केले आहे, अश्या व्यक्तिमत्वाला रोटरी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्यामुळे एकूणच रोटरी परिवारात प्रचंड आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पसरले आहे. रोटरी क्लब चे अध्यक्ष रो. गजानन ठाकूर आणि सचिव रो. गिरीश कुलकर्णी यांनी पांडुरंग राव यांना मिळालेला सन्मान ही क्लबच्या दृष्टीनेच नाही तर एकूणच समाजाच्या दृष्टीने अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. राव साहेबांचे कर्तुत्व एखाद्या पुरस्करपेक्षा कैकपट मोठे असले तरी योग्य व्यक्तिला योग्य बहुमान मिळाल्याचा आनंद काही औरच असतो अशी रो. गजानन ठाकूर, रो. गिरीश कुलकर्णी व रो. राजेंद्र फेगडे, रो. राजेंद्र पाटील तसेच रोटरी क्लब भुसावळ च्या सर्वा सदस्यांची भावना असून. सगळ्यांनी पांडुरंग राव यांचे कौतुक केले.