जळगाव : कोरोना महामारीची दुसरी लाट सुरु आहे. या लाटेला थांबविण्यासाठी प्रत्येक नागरिकाला ‘मास्क, अंतर, स्वच्छता’ या त्रिसूत्रीसह काम करावे लागेल, असे सांगून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात केंद्रीय समिती सदस्य डॉ. अनुपमा बेहेरे यांनी पाहणी करीत वैद्यकीय यंत्रणेला विविध सूचना केल्या.
कोरोना महामारीच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय समिती जळगाव जिल्ह्यात दाखल झाली आहे. रविवारी ११ एप्रिल रोजी समिती सदस्य डॉ. अनुपम बेहेरे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात भेट देत पाहणी केली. यावेळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, प्रशासकीय अधिकारी डॉ. उत्तम तासखेडकर यांनी त्यांचे स्वागत केले. प्रसंगी त्यांनी महाविद्यालय व रुग्णालयाविषयी माहिती जाणून घेतली. रुग्ण दाखल होण्यापासून ते घरी जाईतो कशी प्रक्रिया चालते, रुग्णांसाठी खाटा व्यवस्थापन आणि वैद्यकीय सेवेचे नियोजन याबाबत त्यांनी अधिष्ठाता डॉ. रामानंद यांचेकडून माहिती घेतली. रुग्णालयात औषधांचा साठा किती आहे व तो कसा अद्ययावत करतात त्याची माहिती जाणून घेत समाधान व्यक्त केले.
यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. इम्रान पठाण, कोविड इन्चार्ज डॉ. विजय गायकवाड, डॉ. आस्था गणेरीवाल, जनवैद्यक औषधशास्त्र विभागाचे डॉ. योगिता बावस्कर, डॉ. जितेंद्र सुरवाडे यांचेकडून माहिती जाणून घेतली. सध्याच्या कोरोना महामारीच्या लाटेत रुग्णाला अशक्तपणा येणे हे लक्षण प्रामुख्याने असल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णालयातील मृत्यू विश्लेषणबाबत त्यांनी जाणून घेतले. त्यासाठी तयार केलेला स्वतंत्र डाटा व रुग्णांच्या नातेवाईकांसाठी नेमलेली मृत्यू समन्वय समिती यामुळे डॉ. बेहेरे प्रभावित झाले. तसेच घरीच आजार अंगावर काढून मग उशिराने दवाखान्यात उपचाराला येणे यामुळे बऱ्याचदा रुग्ण दगावतो अशी माहिती प्रामुख्याने विश्लेषणातून देण्यात आली.