मुंबई – कोविडचे अनर्थचक्र थांबवायचे असेल आणि झपाट्याने वाढणारा संसर्ग थोपवायचा असेल तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील, विरोधी पक्ष नेत्यांनी केलेल्या सूचनांचाही निश्चितपणे विचार केला जाईल मात्र सर्व पक्षांनी एकमुखाने याबाबतीत राज्य सरकार घेत असलेल्या निर्णयांना सहकार्य करावे व लोकांमध्ये जागृती निर्माण करावी कारण ही लढाई कोरोनाने आपल्यावर लादलेली असून लोकांच्या जीवाला पहिले प्राधान्य द्यावेच लागेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
राज्यातील कोविड परिस्थिती आणि उपाययोजना यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्ष नेते व मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी ऑनलाईन बैठकीत संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, एकनाथ शिंदे, जयंत पाटील, राजेश टोपे, अमित देशमुख, तसेच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांतदादा पाटील आदींनी सहभाग घेऊन आपल्या सुचना मांडल्या.
प्रारंभी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी कोविड परिस्थिती आणि निर्माण झालेल्या आव्हानाला शासन कसे तोंड देत आहे त्याची माहिती दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की, कोरोनाचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील. आपल्याला प्रथम जीव वाचविण्याला प्राधान्य द्यावे लागेल. ही जर आरोग्याची आणीबाणी असेल तर प्राधान्य हे नागरिकांच्या आरोग्याला आणि जीवाला असले पाहिजे. विरोधी पक्ष नेत्यांनी दिलेल्या सूचनांवर निश्चितपणे गांभीर्याने विचार केला जाईल, त्यांनी चांगल्या सुचना मांडल्या आहेत. विशेषत: रेमडीसिव्हीर उपलब्धता, चाचण्यांचे रिपोर्ट्स लवकर मिळणे, प्रयोगशाळाना यासाठी सूचना देणे, ऑक्सिजन उपलब्ध व्हावा म्हणून काटेकोर नियोजन अशा त्यांच्या सूचनांवर शासन कार्यवाही करेल असेही मुख्यमंत्री म्हणाले.
आपण सर्वसमावेशन नियोजन करू तसेच सर्व घटकांचा यात विचारही करूत पण आत्ता या क्षणी वेगाने वाढणारी रुग्णवाढ थांबवायची कशी हा प्रश्न आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये लोक घरी होते. त्यामुळे रुग्ण व रुग्णांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे सोप्पे होते. आता जेव्हा की सर्व खुले झाले हे तेव्हा यात व्यावहारिक अडचणी येतात ते केंद्राने समजून घ्यावे.
हातावर पोट असणाऱ्या वर्गाची सगळ्यानांच चिंता
मुख्यमंत्री म्हणाले की, एकीकडे लसीकरण वाढविण्याची खूप गरज आहे. युकेने दोन आधीच महिने कडक लॉकडाऊन केला पण त्या काळात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवून नागरिकांना संरक्षित केले. आज युवा पिढीला लस देण्याची गरज आहे. फायझर कंपनी तर १२ ते १५ गटातील मुलांना लस देण्याचे नियोजन करतेय. कडक निर्बंध लावतांना गरीब, श्रमिक, हातावर पोट असणाऱ्या वर्गाला त्रास होऊ नये हि सर्वांचीच भूमिका आहे. त्यादृष्टीने जरुर विचार झाला पाहिजे आणि केला जाईल पण दररोज झपाट्याने वाढणारा संसर्ग आणि रुग्णवाढ काहीही करून प्रथम रोखणे अतिशय गरजेचे आहे.
सर्वानुमते एकमुखाने निर्णय घेऊन या संकटावर मात कशी करावी ते ठरविले पाहिजे. यासाठी लोकांमध्ये आपण सर्व पक्षांनी जागृती केली पाहिजे. रुग्णसंख्या इतक्या वेगाने वाढते आहे की, आज आपण लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला नाही तर उद्या आपोआपच लॉकडाऊनसारखी परिस्थिती उद्भवेल. कोरोना सर्वानांच टार्गेट करीत आहे. त्यात सगळे आले. हातावर पोट असलेला वर्ग सगळ्या विभागांत आणि क्षेत्रात आहे त्यामुळे विचार करायचा तर सगळ्यांचाच करावा लागतो. आज परिस्थिती बिकट बनत चालली आहे. टास्क फोर्सच्या तज्ञांचे म्हणणे देखील आम्ही सातत्याने विचारात घेत आहोत. एका बाजूला जनभावना आहे पण दुसऱ्या बाजूला कोरोनाचा उद्रेक आहे , अशा परिस्थितीत ही लढाई जिंकायची असेल तर थोडी कळ तर काढावीच लागेल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मी गेल्या काही दिवसांपासून विविध क्षेत्रातील लोकांशी बोलतो आहे, काल मी खासगी रुग्णालयांच्या संचालकांशी पण बोललो. राज्य शासनाला सहकार्य करण्याची सगळ्यांची तयारी आहे. सर्व पक्षीय नेत्यांना माझे आवाहन आहे की राज्यातील जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन जो काही निर्णय घेतला जाईल त्याला आपले सहकार्य द्यावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या सुचना मांडल्या. रेमडीसीवीर उपलब्धता, ऑक्सिजन नियोजन, लॉकडाऊन लावण्यापूर्वी संतुलित भूमिका घेणे आदि विषय मांडले.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की रेमडीसिवीरचा काळाबाजार थांबविण्यासाठी कडक पाउले उचलावी लागतील तसेच या औषधाचा अतिरेकही थांबावा लागेल.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रत्येक नगर परिषद व पालिकेकडे लिक्विड ऑक्सिजन साठा टेंक उभारण्यासाठी आवश्यक तो निधी देऊन तत्काळ कार्यवाही करावी असे सुचविले.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ऑक्सिजन कमतरता वाढल्याने प्रश्न उद्भवले असून कडक निर्बंध लावून रुग्ण वाढ रोखावी असे सांगितले.
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, तसेच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रधान सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यास. डॉ तात्याराव लहाने यांनी देखील विचार मांडले.