पुणे, वृत्तसंस्था – वाढत्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात 30 एप्रिलपर्यंत अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तुंची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तुंची दुकानेही सकाळी 6 ते संध्याकाळी 7 या वेळेतच सुरु राहणार आहे.
अत्यावश्यक सेवेतील दुकानदारांनीही करोनासंदर्भातील सर्व नियमांचे पालन करावे लागणार आहे, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली आहे.
पुणे शहरात मोठ्या प्रमाणात नवीन रुग्णांची भर पडत आहे. दररोज पाच हजाराच्या जवळपास रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे शहरात करोना रुग्णांसाठी बेड्स, ऑक्सीजन आणि व्हेंटीलेटरचा तुटवडा भासत आहे. यापेक्षा भयानक स्थिती ओढवू नये यासाठी लाॅकडाऊन हा एकमेव पर्याय शासनासमोर असल्याचे दिसून येते.
गेल्या शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत रात्री 6 ते सकाळी 6 या वेळेत संचारबंदी तर सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली होती. तसेच पीएमपी बस, हाॅटेल्स, माॅल्स, जीम्स, उद्याने, सिनेमागृहे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, रविवारी नवीन रुग्णसंख्या आणि करोनामुळे मृत्यूची संख्या वाढल्यामुळे शासनाने 30 एप्रिल पर्यंत नवीन निर्बंध जाहीर केले आहेत. त्यानुसार, अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तुंची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने उद्यापासून बंद !
राज्य सरकारच्या निर्देशानुसार उद्यापासून पुणे महानगरपालिका हद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने ३० एप्रिल २०२१ पर्यंत बंद असणार आहेत. तसेच राज्य सरकारच्या विकेंड लॉकडाऊनची अंमलबजावणीही शहरात काटेकोरपणे केली जाणार आहे.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) April 5, 2021
या अत्यावश्यक सेवा सुरु राहतील –
रूग्णालयं, डायग्नोस्टिक सेंटर, क्लिनिक, वैद्यकीय विमा कार्यालय, फार्मसीज व फार्मासिटीकल कंपनी, इतर वैद्यकीय व आरोग्य सेवा, किराणा, भाजीपाला, डेअरी, बेकरी, मिठाई व खाद्यपदार्थांची दुकाने, सार्वजनिक वाहतूक – सार्वजनिक बस, टॅक्सी, रिक्षा, रेल्वे, पूर्व पावसाळी नियोजित कामे, स्थानिक प्राधिकरणाद्वारे पुरविण्यात येणाऱ्या सार्वजनिक सेवा, मालवाहतूक, कृषी संबंधित सेवा, ई- कॉमर्स, मान्यताप्राप्त मीडिया, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे घोषित केलेल्या अत्यावश्यक सेवा यांचा समावेश असणार आहे.
तसेच, पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व उद्याने, सार्वजनिक मैदाने सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 6 ते सकाळी 7 वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. तसेच, शुक्रवारी सायंकाळी 6 ते सोमवार सकाळी 7 वाजेपर्यंत या कालावधीत संपूर्णत: बंद राहतील. नागरिकांनी सदर ठिकाणी वावरताना समाजिक अंतर व स्वच्छता बाबतच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असणार आहे. पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व प्रकारची दुकाने, मार्केट व मॉल (अत्यावश्यक सेवा वगळून) संपूर्णत: बंद राहणार आहेत.
नियमांचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. हे नियम 10 एप्रिल 2021 पासून लागू करण्यात येणार आहेत. पुणे महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (पीएमपीएमएल) अत्यावश्यक सेवा वगळून 9 एप्रिल 2021 पर्यंत संपूर्णत: बंद राहणार आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट बंद असणार आहेत. पार्सल सेवा व घरपोच सेवा सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत सुरू राहणार आहे. याशिवाय सर्व धार्मिकस्थळ बंद राहणार आहेत.